Sunday, May 10, 2026
spot_img
Home राजापूर ओणी पुलावर आयशरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

ओणी पुलावर आयशरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील ओणी पुलावर एका आयशर टेम्पोच्या धडकेत दुसऱ्या आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दत्तप्रसाद सुरेश परुळेकर (३८, रा. कोलगाव, सावंतवाडी) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्तप्रसाद परुळेकर हा आपला आयशर टेम्पो घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. प्रवासादरम्यान राजापूर तालुक्यातील ओणी पुलावर लघुशंकेसाठी त्याने आपला टेम्पो बाजूला उभा केला होता. याच दरम्यान पाठीमागून वेगाने येणाऱ्या दुसऱ्या एका आयशर टेम्पोने उभ्या असलेल्या टेम्पोला आणि त्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या दत्तप्रसादला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दत्तप्रसादचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणी धडक देणाऱ्या आयशरचा चालक गोविंद कांबळे (रा. वेंगुर्ला) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कोलगाव परिसरात आणि सावंतवाडी तालुक्यात शोककळा पसरली आहे. दत्तप्रसादच्या पश्चात आई पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे