Monday, October 19, 2026
spot_img
Home संगमेश्वर ओझरेखुर्द येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ओझरेखुर्द येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

देवरूख:- संगमेश्वर तालुक्यातील ओझरेखुर्द येथे एका २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. मंदार अनिल केदारी (वय २१) असे मृत तरुणाचे नाव असून या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, मंदार केदारी याने आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. सकाळी ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी एकच आक्रोश केला. अवघ्या एकविसाव्या वर्षी घडलेल्या या आकस्मिक घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ओझरेखुर्द परिसरासह मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून देवरूख पोलीस ठाण्यात या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास देवरूख पोलीस करत आहेत.