कोरोना काळात प्रतिदिन मोठे नुकसान
रत्नागिरी:- कोरोना महामारीने लॉकडाउन, संचारबंदी, असे निर्बंध कायम आहेत. याचा सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. एसटी महामंडळाचे आर्थिक कंबरडे मोडले असून भारमानावर मोठा परिणाम झाला आहे. प्रवासी मिळत नसल्याने जिल्ह्यात ६०० गाड्यांपैकी ३१० गाड्या सुरू आहेत. कोरोनापूर्वी दोन लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक करणाऱ्या एसटीला आता फक्त ४९ हजार प्रवाशांवर समाधान मानावे लागत आहे. तोट्यात असलेल्या एसटीचे चाक आणखी खोलात रुतले आहे.
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेली एसटीची सेवा अनलॉकमध्ये सुरू केली. हळुहळु ती विस्तारित करण्यात आली. आंतरजिल्हा व ग्रामीण भागातील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सध्या ३१० गाड्यांद्वारे १ हजार ४३३ फेऱ्या सुरू आहेत.
जिल्ह्यात रत्नागिरी विभागाच्या एकूण ६०० गाड्या आहेत. त्यांच्या कोरोनापूर्वी ४ हजार २०० फेऱ्या होत होत्या. दिवसाला सुमारे २ लाख प्रवासी वाहतूक होत होती. प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के वाहतुकीला परवानगी देण्यात आली असतानाही, प्रवाशांचा अल्प प्रतिसादामुळे एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे शालेय फेऱ्या बंद आहेत. ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू झाली असल्याने शेतकरी कामामध्ये व्यस्त आहेत. नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबई, पुणे मार्गावर मात्र प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. खासगी वाहतुकीसाठी परवानगी नसल्याने वाहतूक ठप्प असूनही एसटीचे भारमान मात्र वाढलेले नाही.
खंडाळा, जयगड, सैतवडे अंतर रत्नागिरीपासून जास्त आहे. शिवाय या मार्गावरील बसफेऱ्याही मोजक्याच सुरू आहेत. सध्या खासगी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांना जास्त वेळ ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे या मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये वाढ करून गैरसोय दूर करावी अशी मागणी येथील प्रवाशांनी केली आहे.