एसटी कर्मचारी हजर होण्यासाठीचे सर्व अर्ज निकाली; लवकरच वेळापत्रक नियमित होणार

रत्नागिरी:- एसटी कर्मचार्‍यांनी संप मागे घेतला असले तरी मागील दोन आठवडे हजर होण्यासाठी अपिल अर्ज प्रक्रिया सुरुच होती. आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभागाने दिली. अपिलाचा एकही अर्ज शिल्लक नाही, सगळे अपिल पूर्ण करण्यात आले आहेत. यामुळे हळूहळू एसटीचे वेळापत्रकही सुरळीत होत आहे. त्यामुळे यावेळी उन्हाळी सुट्टीचे एसटी वेळापत्रक नियोजनही लवकरात करण्यात येईल, असेही रत्नागिरी एसटी प्रशासनाने सांगितले.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीरकण करावे या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचार्‍यांनी दिवाळीपासून संप पुकारला. प्रत्येक आगारासमोर एसटी कर्मचार्‍यांनी आंदोलने केली. या संपात  जवळपास रत्नागिरी विभागात साडेतीन हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचार्‍यांनी संप मागे घेतला. संपात सहभागी कर्मचार्‍यांचे मेडिकल आणि अपिल प्रक्रिया करुन घेण्यात येत होती. त्यामुळे संप मागे घेतला तरी कर्मचारी अपिल पूर्ण होण्याचे वाट पाहत होते.  शुक्रवारी सर्व अपिल प्रक्रिया पूर्ण झाली असून, केवळ चार कर्मचारी अद्याप हजर झालेले नाहीत. या चार कर्मचार्‍यांवर मुंबईत गुन्हे दाखल असल्याने अद्यापही त्यांनी अपिल अर्ज केलेले नाहीत. उर्वरीत 100 टक्के कर्मचारी हजर झाले आहेत.

शहर बसेसचेही वेळापत्रकही सुरळीत सुरु झाले आहे. केवळ शाळांना सुट्ट्या असल्याने काही फेर्‍यांची संख्या मात्र कमी करण्यात आली आहे. लांब पल्यांच्या सर्व गाड्या सुरळीतपणे सुरु आहेत.