Tuesday, June 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

रत्नागिरी:- रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरात रविवारी मध्यरात्री भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून ही घटना घडल्याचे समजते. या संघर्षामुळे दोन्ही गटातील व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे येथील एक युवक वेल्डिंगचे काम करतो. पैशांच्या वादातून हा युवक भाजपचे पदाधिकाऱ्याच्या घरी गेला होता. तिथे शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्या युवकाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर या युवकाने गावात जाऊन ही माहिती दिल्यावर, मिरजोळे येथील संतप्त तरुणांनी एकत्र येत भाजप पदाधिकाऱ्याच्या घराकडे धाव घेतली. यामुळे दोन्ही गटात जोरदार संघर्ष झाला. यात मिरजोळे येथील एका युवकाचा पाय मोडल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे, भाजपच्या त्या पदाधिकाऱ्याच्या भावालाही गंभीर मारहाण करण्यात आल्याचे समजते.

हा संघर्ष केवळ आर्थिक वादातून झाला नसून, गेल्या वर्षभरापासून दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाची ही परिणती असल्याचे बोलले जात आहे. जुन्या खुन्नसचा वचपा काढण्यासाठीच हा राडा झाल्याची चर्चा परिसरात आहे. या घटनेमुळे एमआयडीसी भागात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हाणामारीत दोन्ही बाजूचे लोक गंभीर जखमी झाल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.