उष्णतेचा फटका; कोकणचा राजा करपला

रत्नागिरी:- थ्रिप्सच्या प्रादुर्भावामुळे हापूस आंबा अडचणीत आलेला असताना दोन दिवसानंतर अचानक गुरूवारी (ता. 8) पारा 34 अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे फळं भाजण्याची भिती व्यक्त केली आहे. काही ठिकाणी उष्णतेचा परिणाम होस असल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आले.

यंदा पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा ताप पडला. परिणामी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंबा बागायतींमध्ये झाडांची पालवी जुन झाली. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील मोहोर झाडावर दिसू लागला. या मोहोरातील उत्पादन मिळू लागले असून फळं बाजारात दाखल झाली आहेत. दुसर्‍या टप्प्यातील मोहोर अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडला. त्यावर किडरोगांचा प्रादुर्भाव झाला. तिसर्‍या टप्प्यात आलेल्या मोहोरावर वेळीच औषध फवारणी केल्यामुळे त्यामधून एप्रिलच्या दुसर्‍या आठवडयात मिळणार आहे. त्यानंतरचा मोहोर थि्र्ाप्सच्या प्रादुर्भावामुळे काळा पडलेला आहे. त्यामधून उत्पादन मिळणे अशक्य असल्याचे बागायतदारांचे मत आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात पोषक वातावरण होते. थंडीही चांगल्याप्रकारे पडलेली होती. पारा 29 अंशावर होता. मात्र वातावरणात बदल झाले असून पारा 34 अंश सेल्सिअसवर गेला आहे. अचानक वाढ झाल्यामुळे दुपारच्या सुमारास उन्हाची तिव्रता जाणवत आहे. त्यामुळे काही आंबा बागायतीमधील तयार झालेल्या फळांवर उन्हाचा स्ट्रोक बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तसे झाले तर मार्च महिन्यात हाती येणार्‍या उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे.