उबाठाला आज रत्नागिरीत मोठे खिंडार

बंड्या साळवींसह 400 जण शिवसेनेत ; उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती

रत्नागिरी:- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला शुक्रवारी (ता. 24) मोठे खिंडार पडणार आहे. उबाठाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद माजी सदस्य, विभागप्रमुख, सरपंच, शाखाप्रमुख, अन्य कार्यकर्ते असे सुमारे 400 लोक शिवेसनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोठा पक्षप्रवेश होणार आहे.

अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्यातच उबाठा शिवसेनेला उतरती कळा लागली. त्यानंतर काही निष्ठावंतांनी शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने उभं राहण्याचा प्रयत्न केला. त्याला काही प्रमाणात यशही आले. त्यानंतर विधानसभेला रत्नागिरीतली राजकीय परिस्थिती बदलली. शिवसेनेतील निष्ठावंताला डावलून भाजपमधून आलेल्या बाळ माने यांना संधी दिल्याने उबाठाच्या शिवसैनिकांचा धीर खचला. या काळात उदय सामंत, किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीसह जिल्ह्यात शिवसेना जोमाने वाढत होती. शासकीय योजनांमुळे शिवसेनेला आणखी ताकद मिळाली. या घडामोडीत उबाठाचे पदाधिकारी, कार्यकर्ते विकासपासून वंचित राहिले. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी कोणतीही कामे पक्षाकडे नव्हती. उदय सामंत यांनी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विकासकामे देऊन मोठी ताकद दिली. त्यामुळे उबाठाचे पदाधिकारी, कार्यकर्ते काहीसे चलबिचल झाले. भविष्यात उभारी घ्यायची असले तर सत्तेशिवाय पर्याय नाही, हे अनेकांच्या लक्षात आले. त्यामुळे सत्तेत असलेल्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या यांच्या एकाच विचाराच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला, अशी माहिती बंड्या साळवी यांनी दिली. आजवरचा हा सर्वांत मोठा प्रवेश असणार आहे.

हे आहेत प्रवेशकर्ते

उबाठाचे तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी हे शिवेसनेत प्रवेश करणार आहेत. हरचेरी जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य महेंद्र झापडेकर, देवयानी झापडेकर, तेथील पाच सरपंच, करबुडे गटातील अभय खेडेकर, माजी पंचायत समिती सभापती अऩुष्का खेडेकर, वैभव पाटील, शाखाप्रमुख, शहरातील काही कार्यकर्ते असे एकूण 400 लोक उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. विवेक हॉटेलच्या मैदानावर हा प्रवेशाचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारे होणार आहे. बंड्या साळवी यांनी याला दुजोरा दिला.