रत्नागिरी:- आमदार राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी झळकलेल्या ‘निष्ठावंत वाघाची रत्नागिरीत एन्ट्री’ या बॅनरमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यात मंगळवारी मातोश्रीवर बैठक लागल्याने बाळासाहेबांच्या शिवसेनेचे रत्नागिरी विधानसभेचे आमदार, विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात ठाकरे सेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी निवडणुक लढणार हे जवळजवळ निश्चित होते. परंतु मातोश्रीवरील बैठकीत पक्ष वाढवा, मतदारसंघ मजबूत करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याने मोठ्या आशेने गेलेल्या ठाकरे सेनेच्या रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांची निराशा झाली.
रत्नागिरी विधानसभा मतदरासंघावर ठाकरे सेनेचा आमदार निवडून आणण्याचा निर्धार मातोश्रीवरील बैठकीत सोडण्यात आला. जिल्ह्यात मजबूत असलेल्या शिवसेनेत उभी फुट पडल्यामुळे सेनेच्या मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते विभागले आहेत. यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे. आता हळुहळु जुने शिवसैनिक एकत्र येऊ लागले आहेत. त्यात महाविकास आघाडी म्हणून आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय झाला असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही फुट पडल्याने महाविकास आघाडीचीही गोची झाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिंदे सेनेचे बलाढ्य उमेदवार तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात कोण लढणार हा मोठा प्रश्न ठाकरे सेनेपुढे आहे. यापूर्वी आमदार भास्कर जाधव यांचे नाव चर्चेत होते.
राजापूरचे आमदार राजन साळवी यांचा नऊ जुलैला वाढदिवस झाला. या वाढदिवसाला निष्ठावंत वाघाची रत्नागिरीमध्ये एन्ट्री, असे बॅनर झळकले. त्यामुळे उदय सामंत यांच्याविरोधात राजन साळवी २०२४ ची निवडणूक लढणार असा अंदाज बांधण्यात आला. त्यात आज मातोश्रीवर रत्नागिरी विधानसभा मतदरासंघाबाबत बैठक असल्याने त्याला अजून पुष्टी मिळत होती. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतेक पदाधिकारी त्यासाठी मातोश्रीवर गेले. उद्धव ठाकरे रत्नागिरीची जबाबदारी देतील अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु उद्धव ठाकरे यांनी भेटीत पक्ष वाढवा, विधानसभा मतदरासंघ मजबूत करा, एवढ्याच सूचना दिल्या. बैठकीतून काहीच निष्पन्न न झाल्याने ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची निराशा झाली.