इंधनाच्या वाढत्या दरांमुळे आंबा निर्यातही घटणार

रत्नागिरी:-ऐन आंबा हंगामात  अवकाळी पावसाच्या सातत्याने या वर्षी  हापूस उत्पादनात मोठी घट येणार आहे. त्यात इंधनाचे  वाढते  दर आंब्याच्या  निर्यातीत प्रमुख अडसर ठरत आहेत. त्याचे परिणाम निर्यातवरही होणार आहेत. यावर्षी आंब्याची निर्यात पन्नास टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे.

इंधन दरवाढीमुळे हवाई मार्गाने होणारी आंब्याची निर्यात अडचणीत आली आहे. गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी  निर्यातीचा खर्च दुपटीने वाढला आहे.  स्थानिक पातळीवर नैसर्गिक आपत्तींचाही हापूस उत्पादनाला फटका बसत आहे. परिणामी यंदा आंबा निर्यातीत पन्नास टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या हंगामात आंब्याला दोन टप्प्यात मोहोर आला. प्रतिकूल वातावरणाने पहिल्या टप्प्यातील आंब्यांचे नुकसान झाले. दुसर्‍या टप्प्यात अवकाळी पावसाने हापूसला गाठले.  अवकाळी पावसामुळे  हाती येणार्‍या उत्पादनाबाबत साशंकता होती. मात्र, त्यातही फवारणीचा अतिरिक्त खर्च करीत दुसर्‍या टप्प्यातील आंबा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, इंधन दरवाढीत सातत्य असल्याने  निर्यात सुरू झाली असली तरी त्यामध्ये अद्याप  गती आलेली नाही. एप्रिलच्या अखेरीपासून निर्यातीला गती येण्याची शक्यता आहे. मात्र, वाढते दर निर्यातीच्या प्रवासाला पाठविण्यासाठी मारक ठरत आहेत. स्थानिक बाजार पेठेत हापूसच्या डझनाला हजार ते बाराशे रुपये इतका दर मिळत आहे. त्यामुळे  आंब्याची आवक कमी असल्यामुळे शेतकरी, व्यापार्‍यांचा अद्याप निर्यातीवर भर नाही. बाजारात आंब्याची आवक वाढली की, निर्यात वाढण्याची बागायतदरांची अपेक्षा  आहे.