रत्नागिरी:- जिल्ह्यात २९ जून २०२३ रोजी मुस्लीम धर्मियांच्यावतीने बकरी ईद हा सण साजरा करण्यात येणार असून त्याच दिवशी हिंदू धर्मियांचा आषाढी एकादशी हा सण देखील साजरा करण्यात येणार आहे . सध्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन राज्यात जातीय तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे . त्याचे पडसाद उपरोक्त सणादरम्यान पडण्याची शक्यता नाकारता येत नाही . जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) ( ३ ) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात येत आहे .
अपर जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) ( ३ ) सन १९५१ चा कायदा २२ व्या नुसार १८ जून २०२३ रोजीच्या ००.०१ वा . पासून ते २ जुलै २०२३ रोजी २४.०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) ( ३ ) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे . प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा , मिरवणूका तसेच सभा , निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही , असे अपर जिल्हादंडाधिकारी , रत्नागिरी यांनी आदेशीत केले आहे .