रत्नागिरी:- वाहन चालवण्याचा वैध परवाना नसताना तसेच बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरुन येणार्या दुचाकीला धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना बुधवार 27 ऑगस्ट सायंकाळी 4 वा.सुमारास आरेवारे-गणपतीपुळे रस्त्यावर घडली.
सहदेव बिदल लेट (23,मुळ रा.पश्चिम बंगाल सध्या रा.खंडाळा,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार निलेश भागवत यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी सहदेव लेट हा आपल्या ताब्यातील शाईन दुचाकी (एमएच-08-एझेड-5146) घेउन नेवेर ते खंडाळा अशी भरधाव वेगाने बेदरकारपणे चालवत जात होता. त्याच सुमारास महादेव कांबळे (31,रा.सोलापूर) हे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-13-ईई-6443) वर पाठीमागे प्रकाश बनसोडे (26,रा.सोलापूर) यांना घेउन गणपतीपुळे ते रत्नागिरी असे येत होते. ही दोन्ही वाहने वेस्ट बे हॉटेल समोर आली असता सहदेव लेटने त्यांच्या दुचाकीला समोरुन धडक देत अपघात केला. यात दोन्ही दुचाकींवरील तिघेही जखमी झाले असून दोन्ही दुचाकींचेही नुकसान झाले आहे.