आरएसएसच्या संचलनादरम्यान झालेली घोषणाबाजी, लाठीमार यामागचा सूत्रधार समोर येणे आवश्यक: राजेश सावंत

रत्नागिरी:- प्रत्येकाला कार्यक्रम करण्याचा अधिकारी संविधानाने दिलेला आहे. विजयादशमीच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रॅलीत झालेली घोषणाबाजीची घटना, त्यानंतर पोलिसांनी केलेला लाठीमार हे सर्व प्रकार कोणाच्या सांगण्यावरुन झाले हे समजले पाहिजे. याबाबती घटना आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले.

भाजपा दक्षिण रत्नागिरीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, युवकचे डॉ. केळकर व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, विजयादशमीच्या पूर्वसंध्येला प्रतिवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन होते. दरवर्षी वेगगेळ्या भागातून ते संचलन होत असते, यावर्षी किर्तीनगर कदमवाडी ते शिर्के हायस्कूल असे संचलन करण्यात आले. यावेळी किर्तीनगर येथे जमाव जमला व त्यांनी संचलनादरम्यान नारेबाजी केली. यानंतर वातावरण तंग झाले होते. ही घटना चुकीची झाल्याचे मत भाजपाचे आहे. आरएसएस भाजपाशी संलग्न नाही मात्र त्यांची विचारसरणी हिंदुत्वाची आहे. या संघटनेकडून गोरगरीबांना मदत केली जाते. राष्ट्रासाठी या मंडळींनी प्राणाची आहुती दिली असल्याचे सावंत यांनी सांगितले. वेगवेगळे समाज सामाजिक उत्सवानिमित्ताने मिरवणुका काढत असतात. त्यांना देशात स्वातंत्र्य दिलेले आहे.
आरएसएसच्या या संचलनादरम्यान त्यांनी कुणा समाजाविरोधात घोषणा बाजी केली नाही. मग हा प्रकार का घडला, का या समाजाला असुरक्षितता वाढत आहे असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला. या घटनेबाबत तक्रार दाखल झाल्यावर सहा ते सात तास संबंधितांना ताब्यात घेण्यासाठी लागले. यावेळी कोकण नगर येथील नवरात्रौत्सवाच्या ठिकाणी गडबड झाल्याची माहिती आल्यानंतर पोलीस स्थानकातील जमाव त्याठिकाणी गेला. यावेळी पोलिसांनी हिंदू समाजावर लाठीमार केला. परंतु समोरील लोकांना, पोलिसांना धक्काबुक्की करणार्‍यांबाबत मात्र पोलीस शांत होते. नेमक्या या गोष्टी कुणाच्या सांगण्यावरुन केल्या गेल्या असा प्रश्नही राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. याबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून, भाजपाची भूमिका सर्वांना सांभाळून घ्यावी अशीच असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.