‘आमचा रत्नागिरीचा भास्कराचार्य’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 23 हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा 

 रत्नागिरी:-  विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती नाहिशी करणे,  गणित विषयाची आवड निर्माण करणे यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्हाभर ‘आमचा रत्नागिरीचा भास्कराचार्य’ हा उपक्रम राबवला असून, यातील पहिल्या टप्प्यातील परीक्षा मंगळवारी पार पडली. या परीक्षेला तिसरी व चौथीचे एकूण 23 हजार विद्यार्थी बसले होते.

खासगी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा टिकवण्यासाठी सध्या विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला यशही येत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषदेची मुले अव्वल ठरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या केेेंद्र शासनाच्या असर या संस्थेच्या अहवालानुसार राज्यात जिल्हा एक नंबरचा ठरला आहे.

सध्या गेले काही महिने जिल्हाभर आमचा रत्नागिरीचा भास्कराचार्य हा उपक्रम राबवला जात होता. याची अंतिम परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने ही परीक्षा होणार आहे.  पहिल्या टप्प्यात तिसरी ते चौथीची परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेला जिल्हा परिषदेचे तिसरी इयत्तेचे 11 हजार 697 तर चौथीचे 11 हजार 557 विद्यार्थी बसले होते. या परीक्षेला तिसरी ते सातवीचे एकूण 48 हजार विद्यार्थी बसणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती नाहिशी करणे,  गणित विषयाची आवड निर्माण करणे,  गणिताच्या अभ्यासाने विचार करण्याची सवय लावणे, ती सवय दैनंदिन व्यवहारात वापरण्याची सवय लावणे,  शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे,  स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करणे,  विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आदी या योजनेचे उद्दिष्ट आहे.

नियोजनबद्ध परीक्षा पार
या परीक्षेचा पहिला टप्पा मंगळवारी पार पडला. सर्व तालुक्यांनी नियोजनबद्ध व सक्षमपणे पार पाडली. या सर्व परीक्षेचे जिल्हास्तरीय नियोजन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे यांनी केले होते.