रत्नागिरी:- गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड जीवित व वित्तहानी झाली. हे टाळण्यासाठी यंदा नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळावी आणि पूर नियंत्रणासाठी प्रशासनाला मदत व्हावी यासाठी पाटबंधारे विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. जलसंपदा विभागाच्या नाशिकच्या जलविज्ञान प्रकल्पच्या माध्यमातून कृष्णा खोऱ्याच्या धर्तीवर जिल्ह्यातील चिपळूण, खेड आणि राजापुरातील नद्यांवरील पुलांवर रिअल टाईम डाटा ॲक्विजिशन सिस्टीम (आरटीडीएएस) ही अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. एआरएस आणि एडब्ल्युएलआर या दोन यंत्रणांमुळे एका क्लिकवर पडलेला पाऊस आणि नद्यांच्या विद्यमान पाण्याची पातळी कळणार आहे.
मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाची नुकतीच याबाबत बैठक झाली. गेल्या वर्षी जिल्ह्यात महापुराने थैमान घातले. ढगफुटीसारखा पाऊस अचानक पडल्याने यंत्रणेला मदतकार्यात विलंब झाला. यामुळे प्रचंड वित्त व जीवितहानी झाली. गेल्या शंभर वर्षांपूर्वी न आलेल्या पुरापेक्षाही हा सर्वांत मोठा महापूर होता. यंदाही चांगला पाऊस होणार असल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात आहे. जलसंपदा विभागाच्या नाशिकच्या जलविज्ञान प्रकल्पच्या माध्यमातून कृष्णा खोऱ्याच्या धर्तीवर जिल्ह्यातील चिपळूण, खेड आणि राजापुरातील नद्यांवरील पुलांवर रिअल टाईम डाटा ॲक्विजिशन सिस्टीम (आरटीडीएएस) ही अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
जिल्ह्यात अन्य ९ ठिकाणी एआरएस (ॲटोमॅटिक रेनगेज स्टेशन) व ३ ठिकाणी एडब्ल्यूएलआर (ॲटोमॅटिक वॉटर लेव्हल रेकॉर्डर) या यंत्रणेचा नद्यांवर वापर होणार आहे. http://nhpmh.rtdaskrishnabhima.com या वेबसाइटवर क्लिक केल्यास जिल्ह्यात पडलेला पाऊस आणि नद्यांची विद्यमान पाण्याची पातळी किती आहे, याची माहिती दर दोन तासांनी मिळणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास पूर नियंत्रणास प्रशासनाला मदत होणार आहे. आरटीडीएएसमुळे लोकांना आधीच अलर्ट करणे शक्य होणार आहे.









