नावे गुलदस्त्यात ; रत्नागिरीमध्ये कुरघोडीचे प्रयत्न
रत्नागिरी:- शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे शुक्रवारी (ता.१६) ला रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. हाच मुहूर्त साधून शिंदे गटाने जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम ठेवल्याचे समजते. ठाकरे दौऱ्यावर असतानाच शिवसेनेतील काहीजणांचा शिंदे गटामध्ये प्रवेश होणार आहे. याबाबत अनेकांची नावे चर्चेत असली तरी ती गुपित ठेवण्यात आली आहेत; मात्र याला शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांनी साफ नकार दिला. शिवसेनेचा एकही निष्ठावंत कार्यकर्ता शिंदे गटात जाणार नाही, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान सेना विरुद्ध शिंदे गटात पुन्हा एकदा राजकीय स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता शिवसेना विरुद्ध शिंदे सेना असा सामना रंगत आहे. पक्षातील अनेक नेते शिंदे गटात गेल्यानंतर आता मुळ शिवसैनिक सक्रिय होताना दिसत आहे. सेनेतील गळती थांबवण्यासाठी युवानेते आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. दापोलीचे आमदार योगेश कदम पाठोपाठ रत्नागिरीचे आमदार उदय सामंद शिंदे गटात सामिल झाले. आता चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याने सेनेला एका पाठोपाठ एक धक्के जिल्ह्यात बसत आहेत. सेनेला सावरण्यासाठी आणि ऊर्जितावस्था देण्यासाठी १६ तारखेला आदित्य ठाकरे रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीत त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. एवढेच नव्हे तर संवादनिष्ठा यात्रा काढली जाणार आहे.
जिल्ह्यातून सुमारे १५ हजार शिवसैनिक या कार्यक्रमाला येतील, असा दावा सेनेने केला आहे. शिंदे गटाच्या जवळ जाणाऱ्या प्रत्येकाची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे. त्यानुसार अनेक पदाधिकाऱी बदलण्यात आले. शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांना उद्योगमंत्रिपद दिल्याने हळूहळू शिंदे गटाचाही आत्मविश्वास वाढत चालला आहे. त्यामुळे शिवसेनेतील अनेकजण शिंदे गटात येण्यासाठी काठावर आहेत. याचाच फायदा घेऊन ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान शिंदे गटामध्ये काही शिवसैनिकांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे; परंतु त्यांच्यावर दबाव येण्याची शक्यता असल्याने नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत तसेच कार्यक्रमाबाबतही गुप्तता बाळगण्यात आल्याचे समजते.









