रत्नागिरी:- गेल्या आठ दिवसात पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील चार धरणे भरुन वाहू लागली आहे. तीन मध्यम व 65 लघू पाटबंधार्यांमध्ये आजच्या घडीला 228.01 दलघनमीटर पाणीसाठा असून 56.07 टक्के साठा झाला आहे. पावसाचा जोर वाढेल तशी सर्व धरणे भरुन वाहू लागणार आहेत.
जिल्ह्यात 4 जुनच्या दरम्यान मॉन्सून सक्रीय झाला. सुरवातीला पावसाने पाठच फिरवली. गेल्या चार दिवसात सरींचा पाऊस सुरु झाला. हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. परंतु तसा पाऊस रत्नागिरी, संगमेश्वर तालुका वगळता अन्यत्र झालेला नाही. महसूल मंडळनिहाय काही ठिकाणी तास-दोन तास पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस सुरु झाला आहे. अनेक धरणातील पाणी साठा वाढू लागला आहे. जिल्ह्यात तिन मध्यम लघू पाटबंधारे आणि 65 छोटी धरणे आहेत. याचा सर्वाधिक वापर हा नळपाणी योजनांसाठी होतो. गेल्या दोन दिवसात चांगला पाऊस झाल्यामुळे राजेवाडी (चिपळूण), मोर्डे (संगमेश्वर), बेर्डेवाडी (लांजा), गोपाळवाडी (राजापूर) ही चार धरणे भरुन वाहू लागली आहेत. जिल्ह्यात छोट्या-मोठ्या धरणांची पाणी साठा क्षमता 426.29 दलघनमीटर असून उपयुक्त साठा 406.63 दलघनमीटर आहेत. सद्यस्थितीत 228.01 दलघनमीटर पाणी आहे. एकुण साठ्याच्या 56.07 टक्के साठा धरणात आहे. अनेक धरणातील साठा 60 टक्क्यांपेक्षा खाली आहे. गतवर्षी याच कालावधीत 208.15 घनमीटर पाणी साठा होता.