आगामी शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांना मिळणार बोधचिन्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यातील 3 हजार 65 प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या वाहनांवर त्यांचे टीआर. किंवा टी. (टीचर) हे बोधचिन्ह आगामी शैक्षणिक वर्षापासून दिसून येणार आहे. डॉक्टर, वकीलांच्या बोध चिन्हांप्रमाणे शिक्षकांचे बोधचिन्ह पाहून शिक्षक ओळख निर्माण होणार आहे. जिल्ह्यात सुमारे 7 हजार 213 शिक्षक आहेत.

शासनाने शिक्षक संवर्गासाठी पेहराव संदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. या सूचना आगामी शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहेत. त्याचबरोबर शिक्षकांना निश्चित करून दिलेले इंग्रजी भाषेत टीआर. आणि मराठी भाषेत टी. असे संबोधन लावण्यात येणार आहे. शिक्षकांचे हे संबोधन आणि बोधचिन्ह त्यांच्या वाहनांवर लावता येणार आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर, वकील त्यांची बोधचिन्हे वाहनावर लावतात त्याप्रमाणे शिक्षकांनाही त्यांच्या वाहनांवर नवीन बोधचिन्हे वापरता येणार आहे. आता बहुसंख्य शिक्षकांकडे वेगवेगळ्या प्रकारची वाहने असल्याने शिक्षकांची बोधचिन्हे झळकणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात सन 2022-23 च्या नोंदीनुसार 2 हजार 605 प्राथमिक शाळा, 307 माध्यमिक शाळा आणि 160 उच्च माध्यमिक शाळा अशा 3 हजार 62 शाळा आहेत. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्व शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये 7 हजार 213 शिक्षक कार्यरत आहेत.