खेडमधील पाच बहिणींचा क्रांतिकारी निर्णय
खेड:- खेड तालुक्यातून समाजाच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रुढी आणि परंपरांना छेद देण्याची घटना समोर आली आहे. पाच मुलींनी परंपरेला छेद देत आपल्या आईच्या अंत्यसंस्कारात मुलीच आधार ठरल्या. या पाचही मुलींनी आपल्या आईला निरोप देताना मुखाग्नी दिला.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खेड महाडनाका इथं लक्ष्मीबाई तुकाराम पालांडे यांचं २१ ऑगस्ट रोजी अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या पश्चात पाच मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. आईच्या निधनाचे दुःख असतानाही त्यांच्या पाचही मुलींनी अत्यंत खंबीरपणे पुढाकार घेतला.
चार मुली सुनयना सावंत, ज्योती मोरे, सुजाता भोसले आणि निता रेपाळे यांनी आपल्या आईच्या पार्थिवाला स्वतःच्या खांद्यावर घेतले. तर जिल्हा परिषद शाळा तिसे शिगवणवाडी इथं प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या मोठ्या कन्या ममता मंगेश भोसले यांनी आपल्या आईला मुखाग्नी देत अंतिम संस्काराची जबाबदारी पार पाडली. या दृश्याने उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले. कारण हा केवळ अंत्यसंस्कार नव्हता. हा होता ‘मुलगाच हवा’ या मानसिकतेला दिलेला एक भावनिक आणि पुरोगामी संदेश!
अंत्यसंस्काराची वेळ आली की मुलगाच पुढे असावा, अशी परंपरा अनेक वर्षांपासून समाजात पाहायला मिळते. मात्र, मुलगा नसला तरी मुली आपल्या आई-वडिलांचे कर्तव्य पूर्ण करू शकतात, याचे जिवंत उदाहरण या पाच बहिणींनी घालून दिले. परंपरा जपायच्या असतील तर त्या माणुसकीच्या, कर्तव्य निभवायचं असेल तर ते मुलगा-मुलगी असा भेद न करता. लक्ष्मीबाई पालांडे यांच्या पाच मुलींनी आईला दिलेला हा अखेरचा निरोप केवळ एका कुटुंबाची गोष्ट राहिलेली नाही.
तर स्त्री-पुरुष समानतेचा, मुलगा-मुलगी समानतेचा आणि बदलत्या समाजाचा नवा वस्तुपाठ ठरला आहे. या धाडसी आणि पुरोगामी निर्णयाचे खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कौतुक होत असून, स्वर्गीय लक्ष्मीबाई पालांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.









