आंबा बागायतींचे कोकण कृषी विद्यापीठ, कृषी विभागाकडून सर्वेक्षण करा

आंबा बाायतदारांची मागणी

रत्नागिरी:- कडाक्याचा उष्मा, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण अशा विचित्र परिस्थितीचा फटका आंबा बागायतदारांना बसला आहे. यंदा उत्पादनात मोठी घट असून, आंबा बागायतींचे कोकण कृषी विद्यापीठ, कृषी विभागाकडून सर्वेक्षण करा, अशी मागणी जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंग यांच्याकडे आंबा बागायतदारांनी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकार्‍यांनीही संबंधित यंत्रणेला नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्‍वासन दिले.

दरम्यान, आंबा बागायतदारांनी पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देऊन शासनपातळीवर बागायतदारांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे घातले आहे. जिल्हाधिकार्‍यांना भेटीप्रसंगी सुनील नावले, प्रकाश साळवी, पेडणेकर आदींसह बागायतदार उपस्थित होते.

यंदा जिल्ह्यात आंबापिकाला हवामानातील होणार्‍या बदलाचा मोठा फटका बसला आहे. आंब्याचा हंगाम नोव्हेंबरपासून सुरवात होत असतो. यावर्षी सुरवातीपासून पिकाला अनुकूल हवामान तयार झालेले नाही. कधी कडक उन्हाळा तर कधी ढगाळ वातावरण अशा प्रकारच्या हवामानामुळे तुडतुडा मोठ्या प्रमाणात आहे. डिसेंबरमध्ये थंडीऐवजी उष्ण हवामान राहिल्यामुळे झाडांना मोहोराऐवजी पालवी आली. जानेवारी 2023 मध्ये झाडांना मोहोर येण्यास सुरवात झाली; पण खराब हवामानामुळे अपेक्षेप्रमाणे फलधारणा झाली नाही. पीक वाचवण्यासाठी महागड्या औषधाच्या फवारण्या बागायतदरांना कराव्या लागल्या आहेत. त्याचाही उपयोग झालेला नाही. शेवटच्या टप्प्यातील मोहोर करपून वाया गेला. या हंगामात जिल्ह्यात हापूसचे पीक अंदाजे 20 ते 25 टक्केच हाती येईल, असा अंदाज आहे. आतापर्यंतची स्थिती विचित्र आहे. अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याने बागायतदारांचा खर्च निघेल की नाही, अशी चिंता लागून राहिली आहे. या विदारक परिस्थितीमुळे आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या हंगामात येणार्‍या एकूण आंबापिकाचे सर्वेक्षण सक्षम यंत्रणेकडून म्हणजेच कृषी विद्यापीठ, जिल्हा कृषी अधिकारी, महसूल यंत्रणा यांनी करून घ्यावी आणि त्याचा सविस्तर अहवाल शासनाला पाठवावा, अशी विनंती आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी केली. रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्था, पावसच्या कोकण आंबा सेवा संघाने जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंग यांची भेट घेतली.