संगमेश्वर:- रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ट्रक दरीत कोसळून अपघात झाला. पावसवरून हा ट्रक मलकापूर येथे चिरा घेऊन चालला होता. या अपघातात सचिन पाटील (33) हा जागीच ठार झाला.
याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील पावस येथून (क्रमांक MH 09 BC7241) हा ट्रक चिरा घेऊन मलकापूर येथे चालला होता. या ट्रकमध्ये चालकासह क्लिनर व हमाल असे प्रवास करीत होते. ट्रक आंबा घाटातील गायमुखाच्या सुमारे 1 किलोमीटर अलीकडे आला असता थेट दरीत कोसळला. या अपघाताची खबर मिळताच साखरपा पोलीस दुरक्षेत्राचे सर्व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तसेच देवरूख पोलीस निरीक्षक मारुती जगताप हेसुद्धा घटास्थळी पोहचले. रात्रीच्या अंधारात साखरपा पोलीस दुरक्षेत्राचे रोहित यादव आणि प्रशांत यादव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार अंधारात खोल दरीमध्ये उतरून रेस्क्यू ऑपरेशन करून जखमींना दरीतून वर काढले आणि अधिक उपचारासाठी आंबा येथील रुग्णालयात दाखल केले. या अपघातप्रकरणी ट्रकचालकावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील करीत आहेत.