आंबा घाटमार्गे अवजड वाहतूक सुरू करण्यास हिरवा कंदील 

रत्नागिरी:- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया) रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातून सहा चाकी आणि वीस टन वजनी गाड्या सुरु करण्यास हिरवा कंदील दिल्यामुळे वाहतुक सुरु झाली आहे. यासंदर्भातील पत्र प्रकल्प संचालक वसंत पंदरकरांनी रत्नागिरी, कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. त्यामुळे सुमारे चार महिन्यानंतर एसटी प्रवाशांसह विविध उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर साखरपा ते आंबा या घाटात जुलै महिन्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे बारा ठिकाणी दरड कोसळल्याने महामार्ग पुर्णपणे बंद झाला होता. साखरपा ते आंबा या परिसरात पडलेले मातीचे ढिगारे काढून हलक्या वाहने धावण्यास परवानगी दिली गेली. तसेच 71.400 किलोमीटर येथे मुख्य दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या मार्गावरुन अवजड वाहतुक बंद असल्यामुळे एसटी प्रवासी, कोकणातील शेतकरी, लाकूड व्यापारी, चिरे खाण व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला. इंधन, वेळ, पैसा याचा अपव्यय होत होता. याबाबत प्राप्त निवेदनांवरुन पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली 29 ऑक्टोबरला रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आदी उपस्थित होते. या बैठकीत लहान वाहनांच्या वाहतुकीबरोबरच सहा चाकी वाहनांची वाहतुक सुरु करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार संबंधित विभागांनी आंबा घाटातील 68.000 किमी, 69.000 किमी, 71.400 किमी या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तात्पुरते वळण रस्ता तयार केला. हे काम नुकतेच पूर्ण झाले असून एनएचआयच्या अधिकार्‍यांनीही पाहणी करुन हा मार्ग वाहतुकीस सक्षम असल्याचे पत्र दिले आहे. मात्र सहा चाकी वाहनांसाठी अटी-शर्थींही घातल्या आहेत.
आंबा घाटातून प्रवास करताना सहा चाकी वाहनांच्या मालासह एकूण वजन जास्तीत जास्त 20 टन किंवा त्यापेक्षा कमी असावे. त्यापेक्षा जास्त चाकांच्या कोणत्याही वाहनास घाटातून प्रवास प्रतिबंध करण्यात आला आहे. घाटात वेग मर्यादा 40 किमी राहिल. तसेच वाहन चालकांनी वेग, वजन व रस्ता सुरक्षा नियमांचे कोटकोरपणे पालन करावे अशा सक्त सुचना दिल्या आहेत. दुरुस्ताची ठिकाणे आणि दरड कोसळलेल्या भागात एकेरी वाहतुक करण्याच्या सुचना आहेत. जास्त वजनाच्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभाग लक्ष ठेवेल तर महामार्ग पोलिस वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी बंदोबस्त ठेवणार आहेत. एनएचआयकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर तत्काळ वाहतूक सुरु करण्यात आली आहे.