रत्नागिरी:- वातावरणातील बदलांपासून कोकणातील हापूसला सुरक्षा मिळावी यासाठी आंबा पिकासाठी विमा योजना लागू करण्यात आली आहे. यंदा कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आंबा विक्री चांगली झाली असली तरीही वातावरणातील बदलांचा उत्पादनावर परिणाम झाला होता. तशीच काहीशी अवस्था काजू पिकाचीही आहे. दोन्ही पिकांचा विमा परतावा अद्यापही कंपनीकडून जमा केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्याती हजारो आंबा बागायतदार परताव्याच्या प्रतिक्षेत आहेत.
रत्नागिरी जिल्हयात फलोत्पादन व रोजगार हमी योजनेतून आंबा, काजूची लागवड केली जाते. हजारो हेक्टरवर ही लागवड झालेली आहे. जिल्ह्याचे अर्थकारणात आंबा, काजुला व्यावसायाला महत्त्व आहे. आंबा पिक संवेदनशील झाले असून थंडी किंवा तापमान वाढले की त्याचा उत्पादनावर त्वरीत परिणाम होतो. सरलेल्या हंगामात कोरोनाने बागायतदारांना कसरत करावी लागली होती. मुळातच यंदा आंबा पिक उशिराने आले. मार्च महिन्यातील उत्पादन 50 टक्केच होते. तो फायदा बागायतदारांना उठवता आला नव्हता. त्यानंतर कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरवात केली आणि टाळेबंदी सुरु झाली. यंदा प्रथम विमा योजनेत वेगवान वार्यामुळे होणार्या नुकसानीचा समावेश केला आहे. त्यानुसार कडकडीत उन आणि वेगवान वारे यांचा परिणाम उत्पादनावर झाला होता. गेल्या सहा वर्षात पिक विमा योजनेला आंबा, काजू बागायतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील साडेबारा हजार शेतकर्यांनी विमा उतरवलेला होता.
पावसाचा अर्धा हंगाम झाला असून ऑक्टोबरपासून आंबा बागायतदारांना साफसफाई, औषध खरेदीसाठी पैशाची नितांत गरज भासते. अशावेळी या विमा परताव्याच्या रकमेचा फायदा होतो. फळपिक विमा योजनेचा कालावधी संपल्यानंतर महिन्याभरात त्याचा परतावा खातेदारांच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित होते. त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. त्यावर तत्काळ निर्णय व्हावा अशी मागणी बागायतदारंकडून सुरु आहे.