Sunday, August 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी अवघ्या 1 तास 36 मिनिटांत कोकण ते कोल्हापूर!

अवघ्या 1 तास 36 मिनिटांत कोकण ते कोल्हापूर!

70 वळणे अन् 11 स्टेशन्स; वैभववाडी रेल्वे मार्गाचा नव्याने होणार सर्व्हे

रत्नागिरी:- कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारा तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या विकासाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या ‘वैभववाडी -कोल्हापूर’ या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रस्तावित रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी पुण्यातील बैठकीत सांगितले.

त्यामुळे अनेक वर्षे फक्त चर्चेत असलेल्या या मार्गाला चालना मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. हा मार्ग अस्तित्वात आला तर त्याचा रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापार, उद्योगासह पर्यटनाला फायदा होईल, असा विश्वास विलास पाटणे यांनी व्यक्त केला.

पुणे येथे झालेल्या बैठकीला केंद्रीय सहकार व मुरलीधर मोहोळ, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, खासदार ज्योती वाघमारे, खासदार अमोल कोल्हे आदी उपस्थित होते. या रेल्वे प्रकल्पाविषयी पाटणे म्हणाले, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात या १०७.६५ किमी लांबीच्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेप्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांची सुरुवातीची तरतूद केली होती.

यापूर्वी ‘जे. पी. इंजिनिअरिंग’ कंपनीने या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले होते; मात्र, त्यानंतरच्या काळात हा प्रकल्प काहीसा रेंगाळला. आता पुन्हा एकदा मध्यरेल्वेने नवीन सर्वेक्षणाची घोषणा केल्याने कोकणवासीयांच्या विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील नागरिकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, केंद्र सरकार या प्रकल्पाला प्रत्यक्ष मंजुरी कधी देणार आणि सर्वेक्षणाच्या दुष्टचक्रातून या मार्गाला हिरवा कंदील कधी मिळणार, असा सवाल आता विचारला जात आहे. निसर्गरम्य घाटमाथ्यावरील ७० वळणांमधून आणि ११ स्टेशनवरून ताशी ११० किमी वेगाने ही रेल्वे अवघ्या १ तास ३६ मिनिटांत कोल्हापूरला पोहोचेल.

रत्नागिरी आणि दक्षिण कोकणसाठी ठरणार वरदान

पश्चिम महाराष्ट्रातून दररोज सुमारे ८०० ते १००० टन माल (किराणा, दूध, अंडी, भाजीपाला) कोकणात येतो. या रेल्वेमुळे मालवाहतूक अत्यंत स्वस्त व जलद होईल. रत्नागिरी व सिंधुदुर्गातील जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि ताजा मच्छीमार माल थेट पश्चिम महाराष्ट्र व देशाच्या अंतर्गत बाजारपेठेत जलदगतीने पोहोचवणे शक्य होईल.

पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक रत्नागिरीतील गणपतीपुळे, भाट्ये तसेच सिंधुदुर्गातील मालवण व तारकर्ली या सागरी किनाऱ्यांकडे सहज आकर्षित होतील. याउलट, कोकणातील भाविकांना कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूर, पंढरपूर आणि तिरूपती देवदर्शनाला जाणे अत्यंत सोयीचे ठरेल. पश्चिम महाराष्ट्र आणि सागरी किनारपट्टीला थेट जोडणारा हा मार्ग देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीनेही अत्यंत मोक्याचा मानला जातो, असे ॲड. पाटणे यांनी सांगितले.