अवकाळीने हापूसला ग्रहण; उत्पादनात मोठी घट

रत्नागिरी:- यंदा अवकाळीने हापूसचा पिच्छा सोडलेला नाही. यावर्षी प्रतिकुल वातावरणाने आब्ंयाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता होती. त्यानुसार किमान 60 टक्के उत्पादन हाती लागण्याचा अंदाज होता. त्यामुळे थोडक्यात गोड असे या हंगामाचे वर्णन करण्यात येत होते. मात्र आता मे महिन्यातच अवकाळीने कोकण किनारपट्टी भागातील हापूसच्या पट्ट्याला ग्रहण लावले आहे. मे महिन्यातील प्रमुख आणि मुख्य हंगामाताच अवकाळीने हजेरी लावून आंब्याचा उरला सुरला हंगाम संपुष्टात आणल्याची भीती बागायतदारांत आहे.

आंब्याचा महत्त्वाचा आणि शेवटचा हंगाम मे महिन्यातच सुरू होतो. या कालावधीत गावाकडे जावून हापूसची चव चाखण्यासाठी चाकरमानी गावी येतात. मात्र आता मे महिन्यात झालेल्या अवकाळीने या उरल्या सुरल्या हंगामाचाही बट्ट्याबोळ केल्याची भावना बागायतदारांत आहे.

गेले दोन दिवस रत्नगिरीसह अन्य भागात पाऊस झाला. पावसाने हे उत्पादन भिजविल्याने आता फळात कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची काळजी बागायतदारांत आहे. पाऊस पडल्यानंतर आंबे खाणार्‍यांची संख्याही कमी होते. काही समजवर्गात पाऊस पडल्यानंतर आंब्याचा आस्वाद घेणेही टाळण्यात येते. आंब्याची खरेदी करून खाणारा हा वर्गही मोठा असल्याने आता या टप्प्यातील आंब्याचा ग्राहकही घटण्याची शक्यता आहे. यंदाच्या आंबा हंगामाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे मार्चमध्ये कोकणात अवकाळीने सुरुवात केली. त्याला वार्‍याची जोड असल्याने आलेला मोहोर गळून पडला होता. फळगळही झाली. त्यामुळे उत्पादनाला फटका बसला. त्यानंतर डिसेंबरमध्ये थंडी गायब झाली. जानेवारीमध्ये वाढत्या तापमानाने फळ करपले. अशा विविध अडचणी आल्या.