रत्नागिरी:- साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री व उबाठाचे नेते अॅड. अनिल परब यांच्यावर फौजदारी कारवाईला सुरुवात झाली असून सीआरझेड अंतर्गत येणार्या जागेत भराव टाकून त्यांनी रिसॉर्ट बांधल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कारवाई लवकरात लवकर करावी यासाठी आपण जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेतल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नागिरीत आलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भाजपा कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेतली. साई रिसॉर्ट संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत चर्चा केली.
याप्रकरणात अनिल परब यांच्यावर फौजदारी कारवाई सुरु झाली असल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले. न्यायालयात त्यांनी कबुली दिली आहे की साई रिसॉर्ट आपण बांधले आहे. दरम्यान, साईरिसॉर्टच्या ज्या ठिकाणी बांधण्यात आले त्याठिकाणी परवानगी एकाची घेतली आणि बांधले दुसरेच असेही त्यांनी सांगितले. अनिल परब यांच्याविरोधात 7 प्रकारच्या तक्रारी असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.
सीआरझेडअंतर्गत 0 ते 200 मीटरमध्ये बांधकाम करण्यास परवानगी नाही पण याच नियमांचा भंग करीत भराव टाकून अनिल परब यांनी साई रिसॉर्ट बांधले. 200 ते 500 मीटरमध्ये सीआरझेडला काही अंशी सुट देऊन परवानगी व्यवसायासाठी देण्यात येते. जुनी घरे, व्यवसाय असतील त्यांनी रितसर परवानगी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
हे रिसॉर्ट बांधण्यासाठी सुमारे दहा कोटीहून अधिक रक्कम वापरण्यात आली. ही रक्कम कोठून आली याबाबत ईडीकडून चौकशी सुरु असल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष राजन फाळके, जिल्हा प्रसिध्दप्रमुख उमेश कुलकर्णी, जिल्हा चिटणीस प्रशांत डिंगणकर, डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.









