रत्नागिरी:- यंदा अतितिव्र उन्हाळा जाणवत असला तरीही टंचाईची तिव्रता कमी आहे. आतापर्यंत तिन तालुक्यातील 15 गावातील 19 वाड्यांमधील 1 हजार 803 लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उर्वरित सहा तालुक्यात अजुनही टँकर सुरु झालेला नाही.
लांबलेला मोसमी पाऊस, अधुनमधून अवकाळीची हजेरी यामुळे यंदा जिल्ह्यातील भुजल पातळी मोठी घट झालेली नव्हती. त्यामुळे यंदाचा उन्हाळा तिव्र असला तरीही टंचाईच्या झळा कमी बसतील असा अंदाज भुजल तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. अनेक नद्या, नाल्यांच्या पात्रात पाणी वाहते आहे. त्यामुळे किनार्यावरील विहीरींची पाणीपातळी खाली गेलेली नाही. परिणामी एप्रिल महिना अर्धा झाला तरीही टँकरने पाणी पुरवठा केल्या जाणार्या वाड्यांची संख्या कमी आहे. नऊ पैकी तिन तालुक्यात 4 टँकरने पाणी मागवले जात आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत हर घर नल से जल संकल्पना अस्तित्त्वा आणली जात आहे. काही गावांमध्ये कामांना सुरवात झाली आहे. त्यांचा समावेश टंचाईग्रस्तमध्ये केलेला नाही. जलस्वराज्य टप्पा 2 मधून दहा वाड्यांमध्ये पाऊस, पाणी संकलन टाकी उभारली आहे. गावाच्या एका बाजूला डोंगराळ भागात वसलेल्या या वाड्यांना पुरेसा पाणी पुरवठा होत आहे. ती गावे टंचाईतून कमी झाली आहेत. भविष्यातही याच पध्दतीने पाणी योजना पोचवणे शक्य नसलेल्या ठिकाणी याच पध्दतीने पाणी दिले जाणार असल्याचे पाणी विभागाकडून सांगण्यात आले.









