खेड:- खेड तालुक्यातील भोस्ते-अलसुरे सीमेवरील भोस्ते गावच्या हद्दीत गणेश विसर्जनावेळी जगबुडी नदीत बुडालेल्या मंगेश पाटील यांचा अखेर २२ तासांच्या शोधानंतर मृतदेह सापडला. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली होती. दोन युवक नदीच्या प्रखर प्रवाहात अडकले होते. त्यापैकी एकाने कसाबसा पोहत किनारा गाठत जीव वाचवला, मात्र भोस्ते पाटीलवाडी येथील ४० वर्षीय मंगेश पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र प्रखर प्रवाह आणि अंधारामुळे गुरुवारी रात्री शोधकार्य थांबवावे लागले. शुक्रवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. तब्बल २२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर पाटील यांचा मृतदेह सापडला. या शोध मोहिमेत एनडीआरएफचे पथक, विसर्जन कट्टा, खेड रेस्क्यु टीम तसेच खेड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने मोठ्या मेहनतीने काम केले. नदीच्या तीव्र प्रवाहामुळे हे काम अत्यंत आव्हानात्मक ठरले होते, मात्र अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. मृत मंगेश पाटील यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. त्यांच्या घरी यंदाच प्रथमच नवसाचा गणपती आणला होता. मात्र विसर्जनावेळीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून भोस्ते परिसरासह संपूर्ण खेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.