अखेर मच्छीमारांना बाप्पा पावलाच… 

बंपर चिंगळांची लॉटरी, मच्छीमार खुश 

रत्नागिरी:- हंगाम सुरु झाल्यानंतर समुद्र खवळलेलाच होता. त्यामुळे गिलनेटधारकांसह रापणकार मच्छीमारांना मासळी मिळत नव्हती. त्यामुळे मासेमारीवर अवलंबून असलेले छोटे मच्छीमार धास्तावलेले होते; परंतु वादळ शांत झाल्यानंतर आणि गणपतीच्या कृपेने रविवारी (ता. 30) रत्नागिरीतील शंभरहून अधिक मच्छीमारांना गणपतीपुळे जवळ व्हाईट चिंगळं जाळ्याला लागली. 25 ते 50 किलोपर्यंत चिंगळं मिळाल्याने मच्छीमार समाधानी झाले आहेत.

ऑगस्टपासून ट्रॉलिंग, गिलनेटसह होडक्याद्वारे मासेमारीला अधिकृत परवानगी मिळाली; परंतु पावसाळी वातावरण आणि अचानक आलेल्या वादळांमुळे समुद्र खवळलेलाच होता. नौका बुडण्याच्या भितीने अनेक छोटे मच्छीमार समुद्रात जात नव्हते. गणेशोत्सव आला तरीही वातावरण निवळत नव्हते. समुद्र खवळल्यामुळे मासळीही मिळत नव्हती. छोटे मच्छीमार किनार्‍यापासून जास्तीत जास्त 10 वावापर्यंतच मासेमारीसाठी जातात. त्यापुढे खोल समुद्रात ट्रॉलिंगवाले मासेमारी करतात. यंदाच्या मोसमात छोट्या मच्छीमारांना म्हणावी तशी मासळी मिळत नव्हत. अधुनमधून टायनी चिंगळं आणि विविध प्रकारची मासळी जाळ्यात लागत होती. त्यातुन जाण्या-येण्याचा खर्चही मिळत नव्हता.

गणपती बाप्पाच्या कृपेने रविवारी समुद्र शांत असल्याचा फायदा घेत स्वार झालेल्या छोट्या मच्छीमारांना गणपतीपुळेजवळ व्हाईट चिंगळं जाळ्यात सापडली. चिंगळं मिळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर साखरतर, वरवडे, काळबादेवी, मिर्‍या येथील सुमारे शंभरहून अधिक गिलनेट धारक मच्छीमारांना हा चिंगळांचा प्रसाद मिळाला. व्हाईट चिगळांचा आकार 4 ते 5 इंच इतका असून किलोचा दर 510 रुपये मिळत आहे. एका किलोत 30 ते 40 चिंगळं बसतात. यंदाच्या हंगामात एकाचवेळी मच्छीमारांना एवढ्या प्रमाणात मासळी मिळालेली नव्हती. त्यामुळे मच्छीमारांसाठी रविवारी स्पेशल होता. त्या एकाच दिवशी मासळी मिळाल्याने मच्छीमारांना चांगला फायदा झाला आहे.
कोरोनाच्या कालावधीत आर्थिक बिघडलेली असल्याने छोटे मच्छीमार संकटात सापडलेले आहेत. व्हाईट चिंगळं कायमस्वरुपात सापडली तर चांगला फायदा होऊ शकतो. सध्य ट्रॉलिंगला ‘चालू’ चिंगळ मिळत असून किलोला 90 रुपये दर मिळत आहे.