रत्नागिरी:- अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून जिल्ह्यात कला, वाणिज्यसह विज्ञान विषयांसाठी २७ हजार ४२० जागा उपलब्ध आहेत. कोरोनामुळे यंदा दहावीच्या परिक्षा न घेता वर्षभरात घेण्यात आलेल्या अभ्यासावर आधारीत गुणांकन केले होते. जिल्ह्याचा शंभर टक्के निकाल लागल्यामुळे २१ हजार ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे पुन्हा विज्ञान, वाणिज्यसह शहरांमधील दर्जेदार महाविद्यालयांकडील कल वाढणार आहे.
कोरोनामुळे यंदा दहावीचा निकालांतर्गत मूल्यमापनावर लावण्यात आला. दरवर्षीप्रमाणेच यंदाही कोकण बोर्डाने यामध्ये बाजी मारली असून, सर्वच्यासर्व विद्यार्थी पास झाल्यामुळे कोकणचा निकाल १०० टक्के लागला आहे. शासनाच्या आदेशानुसार शनिवारपासून (ता. १४) अकरावी प्रवेश सुरु करण्यात आला आहे. स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यात १४१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यात अनुदानित ६१, विना अनुदानित ५१, स्वयं अर्थसहाय्यित २९ कॉलेज आहेत. एकुण ३९७ तुकड्या आहेत. उत्तीर्ण झालेल्यांपेक्षा अकरावीच्या विविध शाखांमधील जागा अधिक आहेत; मात्र अंतर्गत मुल्यमापनामुळे यंदा विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा टक्का अधिक आहे. हे लक्षात घेता विज्ञान, वाणिज्य दोन शाखांसाठीचा किमान टक्का अधिक राहण्याची शक्यता आहे. गतवर्षी ७५ टक्केला विज्ञानची यादी बंद झाली होती. यावर्षी ती अधिकच्या गुणांवर बंद होऊ शकते. वाणिज्यलाही तीच परिस्थिती राहील असा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्येही अनेक कनिष्ठ महाविद्यालये सुरु आहेत. करिअरच्यादृष्टीने महत्त्व असलेल्या अनेक पालकांकडून पाल्याला शहरी भागातील किंवा तालुका वा जिल्ह्याच्या ठिकाणावरील दर्जेदार महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यावर भर दिला जातो. त्यामुळे नावाजलेल्या कॉलेजीस्चे महत्त्व वाढत असते. परिणामी त्यांना वाढीव तुकड्या मंजूर करवून घ्याव्या लागतात.