अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बंदचा चिमुकल्यांना फटका

रत्नागिरी:- मानधनात वाढ करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील अडीच हजार अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मागील आठ दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे चिमुकल्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील 35 हजार मुले सध्या घरीच बसली आहेत.

राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी 26 जानेवारीपासून अंगणवाडी सेविका व मदतीस यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती. मात्र, अंमलबजावणी झाली नसल्याने काम बंद आंदोलन सुरू आहे. प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांचे दररोज विविध स्वरूपात आंदोलन होत आहे. आतापर्यंत काळी साडी परिधान करुन व काळे झेंडे दाखवून, थाळीनाद करुन, खर्डा भाकर खाऊन व मुलांबाळांसह अंगणवाडी कर्मचार्‍यांनी आंदोलन केले. मात्र, अद्याप शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे पुढील आठवड्याभरातही संप मिटणार की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

मागील दोन वर्षांत कोरोना परिस्थितीमुळे अंगणवाड्या बंद होत्या. याकाळात मुलांचे नुकसान झाले. कोरोना निर्बंध कमी होऊन वर्षभरात आता कुठे शैक्षणिक सत्र सुरळीत होत असतानाच आता पुन्हा चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहण्याची वेळ आल्याने पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील 2 हजार 223 अंगणवाडी सेविका तर 1 हजार 453 मदतनिस सहभागी झाल्या आहेत. 35 हजार मुले अंगणवाडीमध्ये प्राथमिक शिक्षकाचे धडे गिरवत आहेत.