रत्नागिरी:- जिल्ह्यात 77 दरड प्रवण क्षेत्र म्हणून आपत्ती व्यवस्थापनाने जाहीर केली आहेत. दरड कोसळून मानव हानीचे प्रकारही झालेले आहेत; परंतु दरड कोसळण्यापुर्वी त्याची लक्षणे दिसून येतात. ती जाणून घेण्याची क्षमता सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भुशास्त्र विभागाचे निवृत्त प्रमुख डॉ. सतिश ठिगळे यांनी जनजागृतीची मोहिम हाती घेतली आहे. भूस्सखलनामुळे होणारी वित्त आणि मनुष्यहानी टाळण्यासाठी निरीक्षण करण्याचे आवाहन ‘न्यूटन जागवा दरडी थोपवा’ या पुस्तकाद्वारे त्यांनी केले आहे.
‘न्यूटन जागवा, दरडी थोपवा’ हे पुस्तक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जावे त्यातून जनजागृती व्हावी यासाठी डॉ. ठिगळे रत्नागिरीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. ठिगळे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वितरण केले आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे प्रमुख अजय सुर्यवंशी यांच्या सहकार्याने पुस्तकाचे वितरण जिल्ह्यात सुरु आहे. 1968 मध्ये कोयना धरणात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्र हादरला होता. यावेळी अनेक मोठ्या डोंगरांना भेगा पडल्या. त्या भुकंपाचे परिणाम खर्या अर्थाने 1983 पासून दिसू लागले आहेत. संगमेश्वर, चिपळूण, खेड येथे भूस्सखलनाला सुरवात झाली. गेल्या आठ ते दहा वर्षात जिल्ह्यात तब्बल 77 ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. डोंगरातील मोठे भूस्सखलन रोखणे सहज शक्य नाही; परंतु भूस्सखलनाची पुर्वकल्पना मिळाली तर वित्त व मानव हानी टाळू शकतो. हेच आपल्या हाती आहे. त्यासाठी भूस्सखलन, दरड कोसळण्याची पुर्वसुचना मिळणे आवश्यक आहे. कोणतेहि भुस्सखलन, दरड पुर्वसुचना दिल्याशिवाय कोसळत नाही. दरड कोसळण्यापुर्वी तेथील क्षेत्रात अनेक बदल होतात. पंधरा दिवस अगोदरपासून हे बदल दिसू लागतात. या बदलांकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे असते. एखाद्या ठिकाणी भुस्सखलन होणार असेल त्यापुर्वी खडक व मातीचा थर त्यात घर्षण होऊन झर्यांमध्ये माती मिश्रीत पाणी येते. काही ठिकाणी अचानक गरम पाण्याचे झरे वाहू लागतात. ही लक्षणे धोक्याचा इशारा देणारी असतात. या बारकाव्यांकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देवून ते जाणून घेतले तर त्याचा उपयोग समाजासह तेथील वाड्या वस्त्यांना होऊ शकतो. यासाठी आपण विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती सुरु केली आहे, असे डॉ. ठिगळे यांनी सांगितले.