रत्नागिरी:- नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या प्रभाग 5 मधील पोटनिवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी प्रारूप मतदार यादीचे काम सुरू झाले आहे. पंचवार्षिक निवडणूक डिसेंबरला होणार आहे. ही निवडणूक तोंडावर असताना सहा महिन्यांसाठी नगरसेवक होण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या कमी आहे. ज्यांचा या जागेसाठी दावा होता, त्यांना डावलल्याने सेनेत काहीशी नाराज असल्याची चर्चा आहे.
थेट नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे राहुल पंडित 2016 मध्ये निवडून आले होते. तेव्हा शिवसेनेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे बंड्या साळवी यांच्या ऐवजी स्वच्छ चेहरा देण्याचा निर्णय सेनेने घेतला. त्यामुळे बंड्या साळवी यांचे नाव मागे पाडले आणि राहुल पंडित यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचा सेनेला फायदा झाला आणि भाजप, राष्ट्रवादी, अपक्षांना धूळ चारत राहुल पंडित हे थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. मात्र दोन वर्षे झाली आणि पक्षांतर्गत ठरलेल्या अडीच-अडीच वर्षांच्या धोरणाचा नवा फंडा पुढे आला. अडीच वर्षे झाल्यानंतर राहुल पंडित यांनी राजिनामा देऊन बंड्या साळवी यांना पुन्हा उमेदवारी देऊन थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आणण्याचे राजकीय गणित आधीच मांडण्यात आले होते. त्यानुसार राहुल पंडित यांना रजेवर पाठविणे, उपनगराध्यक्ष म्हणून बंड्या साळवी यांच्याकडे पदभार देणे, त्यानंतर मानहानी होऊ, नये म्हणून पंडित यांचा राजिनामा देणे, असे सर्व प्रकार
घडले.
पंडित यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा पोटनिवडणूक लागली. त्यामध्ये बंड्या साळवी पुन्हा नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. नगरसेवक म्हणून त्यांना राजिनामा द्यावा लागला. त्यांच्या राजीनाम्यामुळे प्रभाग 5 मध्ये नगरसेवकपदाची जागा रिकामी झाली. या रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक आयोगाच्या सूचनेने या प्रभागातील सुमारे 4 हजार मतदारांची प्रारूप यादी तयार करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात प्रभाग 5 साठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.









