40 हजार 128 विद्यार्थ्यांची शाळेत हजेरी
रत्नागिरी:- शासनाच्या आदेशानुसार पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू झाल्यानंतर शालेय कामकाज सुरळीत आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 748 शाळा सुरू असून 40 हजार 128 विद्यार्थी उपस्थित आहेत. गेल्या आठ दिवसातील हे चित्र असून शहरी भागात प्रतिसाद अजुनही कमी आहे.
शासनाने 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार टप्याटप्याने जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. जिल्ह्यात 454 शाळा असून 82 हजार 69 विद्यार्थी आहेत. आतापर्यत एकूण 411 शाळा सुरू झाल्या असून 41 हजार 385 विद्यार्थी उपस्थित राहतात. शाळा सुरू होण्याचे प्रमाण वाढले; मात्र उपस्थितीचे प्रमाण 50.23 टक्केच राहिले. कोरोनामुळे पालक मुलांना शाळेत पाठवित नसल्याने ऑनलाईन अध्यापनाकडेच उर्वरित विद्यार्थ्यांचा कल राहीलेला आहे. नववी ते बारावी पर्यंतची मुले पाचवी ते आठवीपर्यतच्या मुलांच्या वयापेक्षा मोठी आहेत. तरीही उपस्थितीबाबत मोठ्या मुलांपेक्षा लहान मुलांची उपस्थिती आठवडाभरातच वाढली आहे. पाचवी ते आठवीच्या एकूण 2 हजार 162 शाळांपैकी 1 हजार 748 शाळा आतापर्यंत सुरू झाल्या असून एकूण 72 हजार 667 पैकी आतापर्यंत 40 हजार 128 विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. ही संख्या अजुन वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.









