मच्छिमार अडचणीत; केवळ बांगड्यावर समाधान
रत्नागिरी:-वातावरणातील बदलाचा परिणाम मासळी उत्पादनावर होत असल्याचे वारंवार पहायला मिळत आहे. गेले दोन दिवस गणपतीपुळेसह परिसरामध्ये काही मच्छीमारांच्या जाळ्यात बांगडा लागल्याने दिलासा मिळाला होता; परंतु गिलनेटच्या मासळीला पाहीजे तसा दर मिळत नसल्याने त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले जाते.
शासनाच्या निकषानुसार पर्ससिननेटद्वारे मासेमारी करण्यासाठी बंधने घालण्यात आली आहेत. 12 नॉटीकल मैलाच्या आतमध्ये पर्ससिननेटवाल्यांना करता येत नाही. त्यानंतर गिलनेटसह ट्रॉलिंग आणि छोट्या मच्छिमारांना मासळी मिळेल अशी आशा असते; मात्र यंदा ती फोल ठरत आहे. समुद्रात नौका घेऊन गेल्यानंतर पाहीजे तशी मासळी मिळत नाही. परिणामी इंधनासाठी येणारा खर्च मच्छीमारांच्या अंगावर पडतो. ना नफा ना तोटा अशीच काहीशी स्थिती अनेकवेळा निर्माण होते. या परिस्थितीवर मात करत छोट्या मच्छीमार व्यावसाय करत आहेत. सर्वच मच्छीमारांना एकाचवेळी मासे मिळत नाहीत. एखाद्या बंदरातील चार नौकांना एका दिवशी तर दुसर्या दिवशी अन्य चार नौकांना मासे मिळतात. गेले दोन दिवस गणपतीपुळेजवळ काही मच्छीमारांना बांगडा मासा मिळाला. गिलनेटच्या एका नौकेला 80 ते 90 किलोपर्यंत मासळी मिळाली. बहूतांश मच्छीमार पकडलेली मासळी दलालांमार्फत बाजारात नेतात. त्यांच्याकडून अपेक्षित दर मासळीला मिळत नाही. बांगड्याला किलोला 75 रुपयांपर्यंत दर मिळाला. गिलनेटच्या जाळ्यात मासा अडकत असल्याने त्याचा दर कमी आकारला जात असल्याचे कारण दिले जाते. आधीच मासळी मिळत नसल्याने मच्छीमार त्रस्त असताना अपेक्षित दरासाठी झगडावे लागत आहे. याबाबत शासनाने लक्ष घातले पाहीजे असे अनेक मच्छीमारांकडून सांगितले जात आहे.