रत्नागिरी:- तालुक्यातील पावस नालेवठार बसस्टॉपजवळ सहा.अभियंता श्रेणी 01, सार्वजनिक बांधकाम उपविभाग 4 यांनी वाहन चालकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत हलगर्जीपणाने डांबर मिश्रित खडी रस्त्यावर उतरवली. त्यामुळे एका दुचाकी चालकाच्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी 8 संशयितांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची ही घटना रविवार 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वा.सुमारास घडली होती. रमेश पाडावे (रा.मिरजोळे), रामचंद्र गराटे (रा.कुवारबाव), सुधाकर पवार (रा.हरचिरी), जगन्नाथ राउत (रा.हरचिरी), सज्जला पवार (रा.पावस),विशाल डाफळे (रा.फगरवठार), राजेश जाधव (रा.चांदेराई) आणि नितीन कळंबटे (रा.झरेवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 8 संशयितांची नावे आहेत. तर या अपघातात दिलिप चंद्रकांत गुळेकर (31, रा. मावळंगेवाडी, रत्नागिरी) हा गंभिर जखमी झाला आहे. रविवारी सायंकाळी तो आपल्या ताब्यातील अॅक्टिव्हा दुचाकी (एमएच-08-एडी-5548) घेउन रत्नागिरी ते मावळंगे असा आपल्या घरी जात होता. तो कोळंबे संजिवनीनगर येथे आला असता रस्त्यात हलगर्जीपणाने उतरवून ठेवण्यात आलेल्या डांबरमिश्रित खडीवरुन त्याची दुचाकी गेल्याने त्याचा अपघात झाला.यात तो गंभिर जखमी झाल्याने कोमात गेला असून त्याच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शुक्रवार 29 जानेवारी रोजी पूर्णगड पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.