रत्नागिरी:- महाविद्यालयासह इंजिनिअरिंग व वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने जातीचे दाखले काढण्यासाठी रत्नागिरीच्या सेतू कार्यालयात मोठी गर्दी होऊ लागली आहे. याचा फायदा घेत दलालांनी चांगलेच हात मारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दलालांचा वाढता वावर सर्वसामान्य जनतेला त्रासदायक ठरू लागला आहे. यामागे सेतू कार्यालयातील काही कर्मचार्यांचादेखील सहभाग असल्याची चर्चा आहे.
लॉकडाऊन उठल्यानंतर शासनाने टप्प्याटप्प्याने शिक्षणक्षेत्राची दारे उघडी केली. महाविद्यालयासह इंजिनिअरिंग व वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मागास प्रवर्गात मोडणार्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला आवश्यक असल्याने हे जातीचे दाखले मिळविण्यासाठी रत्नागिरीच्या सेतू कार्यालयात मोठी झुंबड पहायला मिळत आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील पालकवर्ग दाखले मिळविण्यासाठी सेतू कार्यालयात गर्दी करीत आहेत. मात्र याचा फायदा सेतू कार्यालयात फिरणार्या दलालांनी उठवला आहे.
अर्ज भरून देण्याच्या नावाखाली ग्रामीण भागातून येणार्या जनतेची उघडपणे फसवणूक सुरू आहे. अर्ज भरून दिल्यानंतर प्रतिज्ञापत्र करावे लागते. या प्रतिज्ञापत्रावर साक्षीदार लागतात. साक्षीदाराची ओळख देण्यासाठी ५०० रूपयांपासून १००० रूपये पालकांकडून नाहक उकळण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
दरदिवशी सेतू कार्यालयात दलालांचे नवे चेहरे पहायला मिळत आहेत. काही दलाल तर सेतू कार्यालयातील ठराविक कर्मचार्यांच्या संपर्कात असल्याचेदेखील बोलले जात आहे. यापूर्वी असे प्रकार सुरू झाले होते. मात्र तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी यात लक्ष घालून सुरू असलेला हा प्रकार बंद करून टाकला होता. तसेच दलालांना सेतू कार्यालयात प्रवेश निषिद्ध केला होता. आतादेखील असा निर्णय घेण्याची आवश्यकता असून चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली लूट तात्काळ थांबावी अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.









