कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ 

500 जणांचे नियोजन अवघ्या 291 जणांनी घेतली लस

रत्नागिरी:- पहिल्या टप्प्यात कोरोना लस घेण्यासाठी प्रतिसाद कमी मिळाला होता. त्यानंतर मंगळवारी (ता. 19) झालेल्या दुसर्‍या टप्प्यातही 59 टक्केच लाभार्थ्यांनी लस घेतली. गंभीर आजाराची कारणे देत अनेकांनी लस घेण्यास नकार दिल्याचे पुढे येत आहेत. पाच केंद्रांवर पाचशे जणांना लस दिली जाणार होती; मात्र अवघ्या 291 जणांनी लस घेतली.

कोरोना लसीकरणासाठी 16 हजार 330 मात्रा जिल्ह्यात आणल्या गेल्या आहेत. लसीकरण मोहीमेच्या उद्घाटनाच्या दिवशी 270 लाभार्थ्यांना लस घेतली. त्यांना मोबाईलवरुन संदेश देण्यात आला होता; मात्र प्रत्यक्ष लस घेण्यासाठी अनेकांनी टाळले. त्यानंतर पुढील मोहीमेबाबत अनिश्‍चितता होती. शासनाच्या आदेशानुसार मंगळवारी रत्नागिरी महिला रुग्णालय, गुहागर ग्रामीण रुग्णालय, राजापूर ग्रामीण रुग्णालय, दापोली ग्रामीण रुग्णालय आणि कामथे उपजिल्हा रुग्णायालयातील पाच केंद्रांमध्ये प्रत्येकी 100 प्रमाणे पाचशे जणांना लस देण्यात येणार होती. त्यानुसार मोबाईलवरुन एक दिवस आधी संदेश पाठविण्यात आले. त्यातील 245 लोकांनीच लस घेण्यासाठी उपस्थिती दर्शवली. अजुनही लसीबाबत संभ्रमावस्था असल्यामुळेच हा प्रतिसाद कमी मिळत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. लस घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून मोहीम राबवावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा, अंगणवाडीसेविका यांना प्राधान्य दिले आहे. मंगळवारी घेतलेल्या मोहीमेत रत्नागिरीत अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. शहरी भागातूनच लसीकरणा मोहीमेकडे पाठ फिरवली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. तुलनेत गुहागरसारख्या ग्रामीण भागात उलट परिस्थिती दिसून येते.