रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील सतरा वर्षात महिला आणि बालकांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. या कालावधीत बेपत्ता झालेल्या 149 महिला आणि 35 बालकांचा अद्यापही शोध लागलेला नाही. या बेपत्ता महिला आणि बालकांच्या शोधासाठी रत्नागिरी पोलिसांनी आशा ऑपरेशन राबवण्यात आले. यात आठजणांचा पुन्हा शोध घेऊन त्यांना कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी व्यक्ती हरविण्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला नोंद होतात. यामध्ये महीला, लहान मुले आणि मुली यांची संख्या लक्षणीय आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 2003 ते 2020 या कालावधीत हरवलेल्या महिला आणि हरवलेली-अपहारीत बालके (18 वर्षाखालील मुले/मुली) यांच्यापैकी 149 महीला आणि 35 बालके (18 वर्षाखालील मुले/मुली) मिळून आलेली नाहीत. या आकडेवारीनुसार महिला व बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही गंभीर बाब असल्याने याबाबत विशेष अभियान राबवणे आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांना जाणवले.
या अनुषंगाने 2021 वर्षामध्ये रत्नागिरी पोलीस दलाचे महीला व बालकांची सुरक्षितता राखणे हे प्रथम उद्दीष्ट ठरवून अदयापपर्यंत मिळून न आलेल्या महीला व बालकांचा प्रभावीपणे शोध घेण्यासाठी 1 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीत “आशा ऑपरेशन” मोहीम रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
सदरचे ऑपरेशन यशस्वी होणेकरीता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येकी 01 पोलीस अधिकारी, 2 महीला पोलीस अंमलदार, 2 पुरुष पोलीस अंमलदार यांचे मिळून एक नापत्ता शोध पथक स्थापन करण्यात आले. सदर पथकास वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. या विशेष मोहीमेमध्ये रत्नागिरी शहर, पुर्णगड, जयगड, देवरुख, चिपळुण, दापोली, खेड या पोलीस स्टेशनमध्ये नोंद झालेल्या हरविलेल्या व्यक्तींपैकी 8 महिला आणि 3 मुले व 5 मुली अशी एकूण 8 अल्पवयीन मुले यांचा शोध घेण्यात या पथकांना यश प्राप्त झाले आहे. मिळून आलेल्या या मुलांना त्यांचे पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आशा ऑपरेशनव्दारे मिळून आलेल्या महीला आणि मुले/मुली यांचा प्रभावीपणे शोध घेतल्याने त्यांचे कुटुंबियांना नववर्षाची अविस्मरणीय भेट मिळालेली आहे. यापुढे उर्वरीत हरविलेल्या महीला व बालकांचा शोध प्रभावीपणे घेण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांचे मार्गदर्शनाखाली महीला सुरक्षा विशेष कक्ष रत्नागिरी येथील पोलीस उपनिरीक्षक रेखा जाधव, सपोफौ स्नेहल मयेकर, पोहेकॉ छाया चौधरी, कोमल कदम, मधुरा गावडे, आदीती राऊळ, विदया लांबोरे, पोना सांची सावंत यांनी तसेच रत्नागिरी शहर, पुर्णगड, जयगड, देवरुख, चिपळुण, दापोली, खेड या पोलीस ठाण्यांकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.