जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेचा ना. सामंत यांच्याकडून पंचनामा

रत्नागिरीः– भंडारा येथील दुर्घटनेनंतर रविवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देवून रुग्णालयाच्या कारभाराचा पंचनामा केला. फायर ऑडिटकडे जिल्हा रुग्णालयाने पुर्णतः दुर्लक्ष केले. दीड वर्षापुर्वी प्रसुती विभागाला आग लागूनहि फायर ऑडिट करण्यात आले नाही. रुग्णालयातील तीनहि वरीष्ठ अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत असल्याने संतप्त झालेल्या ना.सामंत यांनी अधिकार्‍यांची खरडपट्टी काढली. चार दिवसात फायर ऑडिटसह स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही तर घरी पाठवेन असा इशारा ना. सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिला. 

भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला आग लागून १० बालकांचा गुदमरुन मृत्यू झाला. यानंतर राज्यातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला. सर्व रुग्णालयांनी तत्काळ फायर ऑडिट काढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी दिले आहेत. या पार्श्वभुमीवर रविवारी सकाळी ना.उदय सामंत यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देवून तेथील फायर ऑडिटची माहिती घेतली. परंतु जिल्हा रुग्णालयासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी यावेळी उपस्थित राहिले नाहीत. जिल्हा रुग्णालयात आगमन होताच ना.सामंत यांनी प्रसुतीगृहाला भेट दिली. तेथे अग्निरोधक यंत्रणा उपलब्ध नव्हती. तर कोरोनाचा प्रदुर्भाव असूनहि वॉर्ड रुग्णांसह नातेवाईक भरगच्च भरलेला असल्याने ना.सामंत यांनी निवासी वैद्यकिय अधिकार चंद्रकांत शेरखाने यांना धारेवर धरले. रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले आहे का याचे उत्तर अधिकार्‍यांना देता आले नाही. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासारख्या इमारती आपल्याकडे आहेत या ना.सामंत यांच्या प्रश्नावर अधिकारी शांत उभे राहिल्याने ना.सामंत संतप्त झाले. दुर्घटना होत आहेत, छोटे-छोटे विषय गांभीर्याने घ्या, फायर ऑडिट करा हे सांगायला मंत्री येथे यायला हवा का मग तुम्ही काय करता अशा शब्दात ना.सामंत यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

भंडारा दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रमीण रुग्णालयातील फायर ऑडिटचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा शल्य चिकित्सकांनी घ्यायला हवा होता, परंतु अधिकार्‍यांना गांभीर्य नाही, चार दिवसात सर्व गोष्टींची पुर्तता करा, आढावा घ्यायला मी पुन्हा येणार आहे. त्याच दिवशी संक्रांत आहे हे लक्षात ठेवा असा इशारा ना.सामंत यांनी दिला आहे. त्यामुळे चार दिवसात अधिकारी काय करतात हे दि.१४ जानेवारीला स्पष्ट होणार आहे.