रत्नागिरी:- सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधीची माहिती शिक्षण समितीमध्ये मांडण्यात आली होती. यु डायसमध्ये शाळांनी नोंदी केल्यानंतर शासनाकडून थेट निधी मंजूर झालेला आहे, असे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सांगितले.
समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा परिषद शाळांना अस्तित्वात असलेल्या व आवश्यक असलेल्या भौतिक सुविधांच्या माहितीची नोंद प्रतिवर्षी प्रत्येक शाळेमार्फत यु डायस प्लस या संगणकीय प्रणालीत करण्यात येते. त्यानुसार 2018-19 च्या युडायस मध्ये 628 शाळांच्या 1 हजार 187 वर्गखोल्यांच्यी दुरुस्ती आवश्यक असल्याची नोंद करण्यात आली होती. त्या 628 शाळांपैकी अत्यावश्यक 125 शाळांचे प्राप्त झालेले दुरुस्तीचे प्रस्ताव व शाळेच्या दुरुस्तीकरिता काही ठराविक बाबी घेण्याऐवजी संपूर्ण शाळा व शाळेचा परिसर दुुरुस्त होईल. यासाठी शाळा इमारतीचे दरवाजे, खिडक्या, लादी, प्लॅस्टर, स्वच्छतागृह दुरुस्ती, रॅम्प, संरक्षण भिंत, छतावरील वॉटर प्रुफींग या बाबींची आवश्यकतेनुसार दुरुस्ती, संपूर्ण इमारतीच्या आतील व बाहेरील रंगकाम आदी बाबींचा अंतर्भाव करुन अंदाजपत्रके महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्याकडे मंजुरी करता सादर करण्यात आली होती. त्यापैकी 2019-20 मध्ये 4 शाळांच्या दुरुस्तीकरिता 21 लाख 54 हजार रुपये इतका निधी मंजूर झाला होता. 2020-21 मध्ये 45 दुरुस्ती कामांना 2 कोटी 57 लाख इतका निधी मंजूर झाला असून त्यापैकी 1 कोटी 40 लाख निधी प्राप्त झाला. मंजूर झालेल्या 45 कामांची माहिती शिक्षण व अर्थ सभापती सुनील मोरे यांना 10 सप्टेंबर 2020 च्या शिक्षण समितीत मांडण्यात आली होती. त्याप्रमाणे मंजुरीकरता पाठवलेल्या 125 कामांची आणि मंजूर झालेल्या 45 कामांची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष व स्थायी समितीपुढे ठेवणे आवश्यक होते. याबाबत शिक्षणाधिकार्यांनी चुक मान्य केली. भविष्यात अशा गोष्टी होऊ नयेत अशी काळजी प्रशासनाकडून घेतली गेली पाहीजे असे अध्यक्ष रोहन बने यांनी बजावले आहे. सर्व शिक्षा अभियानातून वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी बर्याच कालावधीनंतर जिल्ह्याला निधी मिळाला आहे. युडायसमध्ये नोंदणी झाल्यानंतर त्याल थेट निधी मिळत आहे.