रत्नागिरी:- फिट इंडिया मोहिमेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिकच्या पावणे चारशे शाळांमधील 50 टक्के शाळांनी नोंदणी पूर्ण झाली आहे. या माहिमेत पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळातील एका शिक्षकाची आणि विद्यार्थ्यांची नोंदणी करावयाची आहे. प्राथमिकच्या शाळांची संख्या अधिक असून शाळा बंद असल्याने नोंदणीबाबत साशंकताच आहे. नोंदणीची मुदत 10 जानेवारीपर्यंत देण्यात आली आहे.
मुलांच्या शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तीसाठी केंद्र सरकारने फिट इंडिया मोहीम हाती घेतली आहे. शारीरिक सुदृढतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून त्याबद्दल जागृती निर्माण करणे, शारीरिक क्षमता मूल्यमापन चाचण्या या शाळास्तरांवर घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन विषयक माहिती संकेतस्थळावर किंवा मोबाईल अॅपद्वारे भरण्यात यावी यासाठी फिट इंडिया मोहिमेंतर्गत सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी शासनाच्या संकेतस्थळावर करावयाची आहे. कोरोनामुळे या मोहिमेच काम थांबले होते.
शासनाने साई केंद्रांतर्गत देशातील गुणवान खेळाडूंचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परदेशात ऑलम्पिकमध्ये पदक जिंकणार्या खेहाडूंना पहिलीपासून हेरुन उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. त्याच पध्दतीने पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेणार्या मुलांची माहिती ऑनलाईन प्रकियेद्वारे शासन संकलीत करणार आहे. ज्या मुला-मुलींची शारीरिक क्षमता अधिक चांगली आहे अशा विद्यार्थ्यांना साईमार्फत तंत्रशुध्द प्रशिक्षण दिले जाणार आहे.
फिट इंडिया अंतर्गत शाळांची नोंदणी करण्याची 27 डिसेंबर अंतिम मुदत होती. त्यात वाढ करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ 50 टक्के शाळांची नोंदणी झाली आहे. मुदत वाढीमुळे माध्यमिक शाळांमधील शिक्षक कामाला लागले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील सुमारे 34 शाळांची शनिवारपर्यंत नोंदणी झालेली होती.