रत्नागिरी:- नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. कोरोना लस येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरु झाली होती. त्यासाठी आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली असून जिल्ह्यात सुमारे 5 हजार 880 लिटर्स लस साठवणुकीची क्षमता आहे. प्रत्येक तालुक्याकडक किती लस साठवणुक साखळी आहे, त्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात दरवर्षी पोलिओ, रुबेला लसीकरण केले जाते. त्यादृष्टीने जिल्हा आरोग्य विभागाकडून साठवणुकीसाठी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 67 प्राथमिक आरोग्य केंद्र, 8 ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका दवाखाने, जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या माध्यमातून लसीकरण मोहिम राबविली जाते. त्यामुळे कोरोनाची लसही जिल्हा आरोग्य विभागाच्या शीतगृह साखळीत साठविण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकुण 83 विविध क्षमतेची यंत्रणा कार्यरत आहे. त्यात सर्वाधिक क्षमतेच्या 11 युनिटमध्ये 100 लिटर, मध्यम क्षमतेच्या 27 युनिटमध्ये 90 लिटरची आणि कमी क्षमतेच्या 45 युनिटमध्ये 50 लिटरची लस साठवून ठेवण्याची क्षमता आहे. एका लीटरमध्ये इतर लसीचे सुमारे 280 डोस होतात. लस गाव पातळीवर पोचवण्यासाठी वाहतूक यंत्रणाही सज्ज आहे. त्यासाठी 83 वाहने विविध ठिकाणी उपलब्ध आहेत.