डिझेल टाकी सील; नमुने प्रयोगशाळेत
रत्नागिरी:- मच्छीमारी नौकांना पुरवठा केले जाणारे इंधन भेसळयुक्त असल्याच्या तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे. मिरकरवाडा येथे हा प्रकार पुढे आला असून तहसील प्रशासनाकडून संबंधित डिझेल टाकी सिल केली आहे. त्या टाकीतील डिझेल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.
कोकण मच्छिमार सहकारी संस्थेचे सभासद शाहिद मिरकर यांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारीनंतर महसूल प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आली आहे. संस्थेकडून डिझेल घेतल्यानंतरच शासनाकडून येणारा डिझेल परतावा मच्छीमारांना दिला जातो. त्यामुळे संस्थेकडून डिझेल घेणे बंधनकारक असते. संस्थेकडील डिझेलमुळे नौकेला कमी अॅव्हरेज मिळत असल्याचे मच्छीमार शाहीर मिरकर यांच्या लक्षात आले. त्यांनी नौकेत भरल्या जाणार्या डिझेलचा नमुना घेऊन पेट्रोल पंपातील डिझेलशी तुलना केली. संस्थेमार्फत पुरवठा होणारे डिझेल भेसळयुक्त असल्याचे लक्षात आले. ही बाब मच्छीमार संघटनेच्या सदस्यांपुढेही मांडला. शनिवारी (ता. 2) दुपारी सर्व मच्छीमार मिरकरवाडा येथील त्या टाकीच्या इथे पोचले. याबाबतची तक्रार तहसिल प्रशासनाकडे करण्यात आली. त्यानंतर नायब तहसिलदार श्रुती सावंत यांच्यासह तलाठी धनंजर चवंडे, पुरवठा अव्वल कारकुन दिपक आंबेकर, झिजाजी कोकरे हे घटनास्थळी पोचले. डिझेल पुरवठा करणार्या संंबंधित व्यक्तीला घटनास्थळी बोलावण्यात आले होते. पुरवठादार संस्थेतील पदाधिकारी दोन तास उशिराने घटनास्थळी दाखल झाले. टँकरला असलेले कुलुप काढल्यानंतर अधिकार्यांनी नमुने घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. भेसळयुक्त टँकर पुरवठा होत असल्याची माहिती समजताच मच्छिमारांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी मिरकरवाड्यात एकत्र आले होते. असे इंधन वितरीत होत असेल तर नौकांची हानी होईल. त्यामुळे संबंधित संस्था चालकांविरोधात कडक कारवाई करा अशी मागणी मच्छिमारांनी केली आहे.









