जलक्रीडा व्यवसायाला शासनाकडून हिरवा कंदील

रत्नागिरी:- जलक्रीडाला एक महिन्यानंतर राज्य शासनाकडून हिरवा कंदिल मिळाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या व्यवसायावर अवलंबून असलेल्या शंभरहून अधिक लोकांचा रोजगार सुरु झाला. गणपतीपुळे येथे पहिल्याच दिवशी पर्यटकांनी समुद्र सफरीसाठी गर्दी केली होती. यामधून सुमारे एक लाख रुपयांची उलाढाल झाली.

कोरोनामुळे सर्वच जग थांबले होते. त्याचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यावसायिकांना बसला. सरत्या दिवाळीत मंदिरे सुरू झाली आणि पर्यटन व्यवसायाला झळाळी मिळाली; परंतु हा आनंद जलक्रीडा व्यवसायिकांसाठी औटघटकेचा ठरला. समुद्र सफरीसाठी पाण्यात जाणार्‍या बोटीमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवले जात नाही, सॅनिटायझर वापरत नाहीत असा ठपका ठेवत कोरोनाचे कारण देऊन जलक्रीडांवर बंदी घालण्यात आली. सात महिन्यांनी सुरु झालेला व्यावसाय दोनच दिवसात बंद झाला. त्यानंतर जलक्रीडा व्यावसायिकांची तारांबळ उडाली.

रत्नागिरी जिल्ह्यात आरेवारे, काजिरभाटी, गणपतीपुळे, गुहागर, दापोली तालुक्यातील मुरुड यांसह बर्‍याच किनार्‍यावर जलक्रीडा सुरु आहेत. यामध्ये काही कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. पैसे मिळवायच्या दिवसात घातलेल्या बंदीने व्यावसायिक हळहळले होते. गणपतीपुळे सारख्या पर्यटनस्थळावर दिवसाला चार ते साडे चार हजार पर्यटक भेटी देत होते. त्यातील 10 टक्के लोकांनी जलक्रीडांचा आस्वाद घेतला तरी त्यामधून हजारो रुपयांचा फायदा व्यावसायिकांना होणार होता. स्थानिक आमदारांपासून ते पर्यटनमंत्र्यांपर्यंत सर्वांनाच या व्यावसायिकांनी साकडे घातले. त्याला यश आले असून दोनच दिवसांपुर्वी बंदर मंत्री अस्लम शेख यांनी वॉटर स्पोर्टस्ला परवानगी देत असल्याचे जाहीर केले. त्यासाठी आवश्यक ती मार्गदर्शक तत्वेही घालून दिले आहे. सॅनिटायझिंग, मास्क यावर बंधने घालण्यात आली आहेत. गणपतीपुळेत अजुनही दिवसाला चार हजार पर्यंटक येऊन जात आहेत. जलक्रीडांचा आस्वाद घेता येत नसल्याने अनेक पर्यटकही नाराज होते; मात्र शनिवारपासून समुद्र सफरींचा आनंद घेण्यास पर्यटकांना मिळू लागला आहे.