नवोदयमध्ये परजिल्ह्यातील मुलांना प्रवेश नको

जि. प. अध्यक्ष बने; दिल्यास कारवाई होणार

रत्नागिरी:- नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी परजिल्ह्यातील मुलांना ज्या शाळा प्रवेश देत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केली. याबाबत आधारकार्डवरुन संबंधितांची तपासणी करण्याच्या सुचना अध्यक्ष रोहन बने यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत नवोदय विद्यालयातील प्रवेशावरुन दीपक नागले यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. जिल्ह्यातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी नवोदय विद्यालय सुरू करण्यात आले आहे; मात्र या शाळेत बहुतांश विद्यार्थी हे परजिल्ह्यातीलच असतात. या प्रवेशासाठी काही खासगी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाचवीसाठी प्रवेश घेतला जातो. काही वर्षांपूर्वी हा प्रकार उघड झाला होता. राजापुरमधील अनेक पालक नवोदयमध्ये प्रवेशासाठी पुढे येतात; मात्र परजिल्ह्यातील मुलांनाच प्रवेश मिळतो. जर स्थानिक मुलांना लाभ देण्यासाठी हे विद्यालय असेल तर तो मिळालाच पाहिजे. यंदाचे प्रवेश ताबडतोब रद्द करावेत. यामध्ये अधिकार्‍यांनी, शाळांच्या मुख्याध्यापकांनी सहकार्य केले असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागले यांच्यासह अन्य सर्व सदस्यांनी केली.