सरपंच पदासाठी 15 डिसेंबरची आरक्षण सोडत पुढे ढकलली

रत्नागिरी:-  ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर सरपंच पदाच्या आरक्षणासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते; मात्र 15 डिसेंबरला होणारी आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आल्यामुळे अनेक गाव पुढार्‍यांचा हिरमोड झाला आहे.

एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या आणि लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका 15 जानेवारीला होत आहेत. तत्पूर्वी 15 डिसेंबर रोजी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत होणार होती. 15 डिसेंबर रोजी देवदीपावली असल्याने, हा दिवस शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी बहूजन विकास आघाडीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 23 ते 30 डिसेंबरपर्यत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ग्रामीण भागातील गाव पुढार्‍यांची नजर 15 डिसेंबरला होणार्‍या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागली होती. शासनाने 15 जानेवारी मतदानानंतर सरपंच पदाचा आरक्षण सोडत कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले आहेत.
देव दिवाळीच्या दिवशीची आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. या दिवशी शेतकर्‍यांचा सण असतो. विडे भरण्याचा कार्यक्रम गावोगावी होत असल्याने सर्वजणं तिथे व्यस्त असतात. ही बाबत निवेदनाद्वारे आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. याच वेळी आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आमचा सण उत्साहात साजरा करु शकतो असे बविआचे नेते तानाजी कुळ्ये यांनी सांगितले.