रत्नागिरी:- शहरी भागात मोबाईलच्या रेंजचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे शाळा बंद ठेवून ऑनलाईन शिक्षण देणे शक्य आहे. मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांवर सक्ती करु नये असे आदेश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या केल्या जात असलेल्या सुरक्षेविषयक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी मिश्रा यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, माध्यमिक शाळांचे कामकाज सुरु झाले आहे. शहरी भागातील शाळांमध्ये मुलांचा प्रतिसाद कमी आहे. ऑनलाईन शिक्षण देणेही शक्य आहे. त्यामुळे शाळा बंद ठेवल्या तरीही शिकवणी सुरु राहील; मात्र ग्रामीण भागात तशी परिस्थिती नाही. रेंज नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी सुचना केल्या आहेत. ज्या गावांमध्ये कोरोना पोचलेला नाही, तेथील शाळा सुरु कराव्यात. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा अवलंब करुन प्रत्यक्ष शिकवणी सुरु करण्यात येणार आहे.
ते म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट येणे अशक्य आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाकडून उपाय केले गेले आहेत. अन्य राज्यातून येणार्या लोकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी पालघर, सिंधुदुुर्ग जिल्ह्याच्या सिमेवर तपासणी पथके नेमली आहेत. कोकण रेल्वे मार्गावर मंगला, राजधानी या गाड्यांमधून परराज्यातील लोकं जिल्ह्यात येऊ शकतो. त्यासाठी रेल्वेस्थानकांवर तपासणी पथके नियुक्ती करण्यात येणार आहेत. बसस्थानकांवरही अशा प्रकारची आरोग्य पथके राहणार आहेत.