शाळा सुरू होण्याचा मार्ग खडतर

८३ हजार पैकी केवळ १४०० विद्यार्थीच शाळेत येण्यास तयार

रत्नागिरी:- जिल्ह्यातील 196 शाळांमधील 1400 विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमती पत्र सादर केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांमध्येच संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन शाळा सुरु करण्याबाबत कोणता निर्णय घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाच्या परिस्थितीत जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात काय परिस्थिती आहे याचा आढावा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अपर सचिव वंदना कृष्णा यांनी घेतला. यावेळी रत्नागिरीच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, उपशिक्षणाधिकारी गोपाळ चौधरी सहभागी झाले होते. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शाळा सॅनिटायईज करणे अशक्य असल्याचे खासगी संस्था चालकांकडून सांगण्यात आले; मात्र कोरोनाशी संबंधित सुरक्षेबाबत आवश्यक सुविधा संबंधित शाळांनी पुरवाव्यात यावर प्रशासन ठाम आहे. याबाबत अधिकार्‍यांनी तशा सुचना दिलेल्या आहेत. याप्रसंगी रत्नागिरीच्या शिक्षणाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा सादर केला. जिल्ह्यात 9 वी ते 12 वी च्या 458 एकुण शाळा आहेत. त्यामध्ये 83 हजार 136 विद्यार्थी आहेत. शाळेत येणार्‍या मुलांसाठी समंती पत्र आवश्यक केले आहे. जिल्ह्यातील अवध्या 1400 विद्यार्थ्यांच्या पालकांनी समंतीपत्र 196 शाळांकडे सादर केले आहे. अनेक पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून भितीही तेवढीच आहे. शाळेत गेल्यानंतर मुलांच्या आरोग्याची जबाबदारी कुणाची हा प्रश्‍न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षणापेक्षा ऑनलाईन शिक्षणावरच भर द्यावा लागणार आहे.

शाळेत जाण्यापुर्वी दुर्धर आजार असलेल्या शिक्षकांची आरटीपीसीआर तर उर्वरित शिक्षकांची अ‍ॅण्टीजेन चाचणी केली जात आहे. जिल्ह्यातील 5,990 पैकी 1,130 शिक्षकांच्या चाचण्या झाल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून जास्तीत जास्त चाचण्या करता याव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सोमवारपर्यंत पन्नास टक्केच शिक्षकांच्या चाचण्या करो शक्य आहे. उर्वरित शिक्षकांना पहिल्या दिवशी शाळेत पोचणे अशक्य आहेत.