सोमवारपासून विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरु

रत्नागिरी:- राज्य शासनाच्या आदेशानुसार नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. त्यासाठी शाळांच्या मागणीपत्रानुसार एसटीच्या फेऱ्या गावांमध्ये सोडण्यात येणार आहेत. शहरी फेऱ्यासुद्धा सोडण्यात येतील, अशी माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली. तसे आदेश सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आले असून शाळांनी त्यांच्याशी संपर्क साधावा.

दिवाळी सणामुळे सध्या एसटीला गर्दी आहे. बहुतांशी गावांमध्ये एसटी वाहतूक सुरू झाली आहे. येत्या २३ पासून शाळा सुरू होत असल्याने तत्पूर्वी विद्यार्थी कोणत्या गावाहून येणार, त्यांना एसटीची आवश्‍यकता आहे का याबाबतची माहिती प्रत्येक शाळेने नजीकच्या एसटी आगाराला द्यावी. त्यानुसार गाड्यांची उपलब्धता करून दिली जाणार आहे.

परंतु अजून पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत. त्यामुळे नेमकी किती मुले शाळेत येणार, हे निश्‍चित झालेले नाही. सध्या रत्नागिरी एसटी विभागात ५५० नियते असून फेऱ्या १५०० च्या दरम्यान सुरू आहेत. एकूण १ लाख ७२ हजार ५०० किमीची वाहतूक चालू आहे. एसटीला शासनाने वेतनासाठी आर्थिक पॅकेज दिल्यामुळे तीन महिन्याचे थकीत वेतनही मिळाले आहे.