रत्नागिरीत विमानसेवा सुरू होण्याची शक्यता कमीच

रत्नागिरी:- रत्नागिरीकरांचे विमानसेवेचे स्वप्न धूसर झाले आहे. तटरक्षक दलाच्या येथील विमानतळावरून सुरू होणार्‍या खासगी विमानसेवा निकषांमध्ये अडकण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे सेवेमुळे मुंबई 4 तासाच्या अंतरावर येणार आहे. ‘शॉर्ट डिस्टन्स’ झाला आहे. वाढीव धावपट्टीला जागा देण्यास स्थानिकांचा विरोध आहे. यामुळे रत्नागिरी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता कमी आहे, असा दुजोरा खासदार विनायक राऊत यांनी दिला.

शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहर प्रमुख बिपिन बंदरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरीतील हवाई वाहतुकीची भरारी आता दूर नाही,लवकरच ही हवाई सेवा सुरू होणार , असे वारंवार लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात होते. तटरक्षक दलाच्या तळाचे विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरात दलाची विमाने येथे लॅण्ड होतील त्यानंतर संरक्षण मंत्रालयाची परवानगी घेऊन दोन महिन्यात खासगी प्रवासी वाहतूक सुरू केली जाईल. असे यापूर्वी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. पूर्वी रत्नागिरी-मुंबई ही हवाई सेवा सुरू होती. मात्र ती बंद पडली. तेव्हा एमआयडीसीच्या ताब्यात रत्नागिरी विमानतळ होते. मात्र आता हे विमानतळ तटरक्षक दलाने ताब्यात घेतले आहे. सुरक्षेच्यादृष्टीने कोकणातील मोठा तळ येथे उभारला जात आहे. या ठिकाणी विमानसेवा सुरू होण्यासाठी धावपट्टी वाढविण्याची गरज होती. काही कोटी रुपये खर्च करून तटरक्षक दलाच्या या तळाचे विस्तारीकरण सुरू आहे. मात्र वाढीव धापट्टीला स्थानिकांनी संमती न दिल्याने हे काम रखडले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मुंबई 4 तासावर येणार आहे. रेल्वेमुळे देखील हे अंतर कमी झाले आहे. शॉर्ट डिस्टन्स झाल्यामुळे रत्नागिरी विमानतळावरून खासगी प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यात सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. याचा सारासार विचार करून रत्नागिरी विमानतळावर खासगी सेवा सुरू होण्याची शक्यता कमी असलाचा दुजोरा खासदार विनायक राऊत यांनी दिली.